शहर व तालुक्यातील गावागावात जाऊन ६६ वक्ते महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचविणार
अमळनेर : महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती २०२३ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत येथील स्टेशन रोड वरील प्रबुद्ध विहारात पुरोगामी विचारसरणी च्या कार्यकर्त्यांची सहविचार सभा नुकतीच संपन्न झाली. यावेळी धुळे शहरात होणाऱ्या शिवशाही महानाट्याचे प्रचारक धुळे येथील डॉक्टर सुशिल महाजन, संभाजी ब्रिगेड चे श्याम पाटील, शिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, शिवशाही महानाट्याचे आयोजक बी.जे.हिरे, हेमंत भडंग, शाम निरगुडे, युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार उपस्थित होते. त्यांनी छत्रपती शिवराय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेचे पूजन केले. सौ. वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना गायिली.
प्रा. अशोक पवार यांनी राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाबाबत भूमिका मांडली. यावर्षी प्रथमच शाळा, महाविद्यालय व गावागावात जाऊन शिवजयंती २०२३ पंधरवाडा साजरा करण्यात आला. त्याचप्रमाणे दिनांक ५ एप्रिल ते ५ मे या एक महिन्याचे काळात ६६ वक्ते ६६ ठिकाणी शहर व तालुक्यातील गावागावात जाऊन महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहोचवणार असल्याचे सांगितले. यानंतर शिवजयंती २०२३ उपक्रमात सहभाग असलेले दयाराम पाटील, राहुल निकम, डॉ. विलास पाटील, संजय सूर्यवंशी यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त होणाऱ्या या उपक्रमात ज्या कोणाला सहभागी व्हावयाचे असेल त्यांनी आपले नाव युवा कल्याण प्रतिष्ठान कडे नोंदणी करुन घ्यावयाची आहे. अभियानात या पहिल्याच बैठकीत ३३ वक्त्यांनी आपला सहभाग नोंदविला. परिक्षेचा काळ असल्याने विद्यार्थ्यांना सहभागी केलेले नाही. परिक्षा संपल्यावर साधारण पणे दिनांक २९ व ३० एप्रिल रोजी वक्त्यांची कार्यशाळा घेण्यात येणार असून दिनांक ११ मे रोजी सानेगुरुजी जयंतीचे औचित्य साधून वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी मनोहर निकम, सौ. वसुंधरा लांडगे, प्रा. लिलाधर पाटील, रणजित शिंदे, बाळासाहेब संदानशिव, प्रवीण पाटील, गौतम मोरे, प्रा. राहुल निकम, डॉ. विलास पाटील, श्रीकांत चिखलोदकर, अशोक सोनवणे, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, संजय सूर्यवंशी, दयाराम पाटील आदी उपस्थित होते.