पोस्टर प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी घेतली अवकाश संशोधनाची माहिती

वावडे येथील श्री बी. बी. ठाकरे हायस्कूल चा अभिनव उपक्रम

अमळनेर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अवकाश संशोधन संस्थेचे कार्य कसे चालते या विषयीची पुरेशी माहिती मिळावी, अवकाश स्थानक, कृत्रिम उपग्रह, सॅटेलाईट व्हेईकल्स, जिएसएलल्व्ही, पीएसएलव्ही इ.ची माहिती शाळेतच मिळावी यासाठी अमळनेर तालुक्यातील वावडे येथील श्री बी.बी.ठाकरे हायस्कूल ने रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजि फाऊंडेशन च्या मदतीने जवळपास शंभर च्या वर पोस्टर्स चे प्रदर्शन दि.२८ मार्च रोजी विद्यालयात आयोजित केले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पाटील यांनी केले. शाळेत सुरू असलेल्या कलाम चाईल्ड सायंटिस्ट सेंटर चे संचालक तथा उपक्रमशील विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही अनमोल संधी देशातील नामांकित अशा रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ चंद्रमौली जोशी, नॅशनल कौन्सिल ऑफ टीचर सायंटिस्टचे नॅशनल सेक्रेटरी संदीप पाटील, एपीजे अब्दुल कलाम यंग सायंटिस्ट चे व्हॉइस चेअरमन सुनील वानखेडे यांच्या माध्यमातून ही विशेष संधी उपलब्ध करून दिली.

पोस्टर प्रदर्शन हा एक अप्रतिम, नाविन्यपूर्ण उपक्रम असून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासोबतच अवकाश विज्ञान क्षेत्राचेही मूलभूत ज्ञान प्राप्त होण्यास मदत होईल. त्याचबरोबर अभ्यासक्रमात असणाऱ्या ह्यासंबंधीत संकल्पना विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजण्यास ह्यामुळे नक्कीच मदत होणार आहे. या वर्षी प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविला असून पुढील शैक्षणिक वर्षांपासून जिल्ह्यातील प्रत्येक शाळेवर असा कार्यक्रम घेण्याचा जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचा मानस आहे.

निरंजन पेंढारे, संचालक : कलाम चाईल्ड सायंटिस्ट सेन्टर तथा विज्ञान शिक्षक : श्री बी. बी. ठाकरे हायस्कूल, वावडे.

पोस्टर्स च्या माध्यमातून विविध साठ सॅटेलाइट व्हेईकल्स व पंधरापेक्षा जास्त वैज्ञानिकांची माहिती देणारे पोस्टर तयार केलेत ह्यावेळी विद्यार्थ्यांनी अवकाश स्थानक म्हणजे काय ? अवकाश स्थानकामध्ये उपग्रह सोडल्याने होणारे फायदे, उपग्रह सोडण्यासाठी तयार करण्यात येणारे सॅटेलाइट व्हेईकल्स, हबल टेलीस्कोप, स्पेस कॅप्सूल, स्पेस सूट कसा कार्य करतो ? त्यामधील उपलब्ध सुविधा, विविध खगोलीय दुर्बिणी, अंतराळ संशोधनातील सर्वोच्च अशा नासा, इस्रो, स्पेसेक्स इ. संस्थांची इत्यंभूत माहिती निरंजन पेंढारे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने प्रत्येक चार्ट चे सखोल निरीक्षण केले व महत्वाच्या नोंदी आपल्या वहीत नोंदवून घेतल्या. अधिक माहितीसाठी इस्रो संस्थेस प्रत्यक्ष भेट देण्याचा मानस ही त्यांनी व्यक्त केला. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी व्ही.एम.पाटील, भाग्यश्री सावळे, प्रल्हाद पाटील, राजू पारधी, जगदीश राजपूत, प्रशांत पवार, भगवान सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद पाटील यांनी केले तर आभार रविंद्र देवरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यार्थी, शिक्षक यांनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!