कामातून आनंद मिळतो, निःस्वार्थपणे केलेले कामच दखलपात्र : पुरस्कारार्थी विजय पवार
अमळनेर : येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात काल वऱ्हाडी हास्य कवी संमेलनाने व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफले. यावेळी खानदेश स्तरीय पूज्य साने गुरुजी सहाव्या पुरस्काराचे मानकरी विजय पवार यांना श्री संत सखाराम महाराज विठ्ठल रुक्मिणी संस्थान चे गादीपती हभप प.पू. सदगुरु प्रसाद महाराज यांचे शुभहस्ते शाल, स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. विजय पवार यांचे निःशुल्क कार्य, समाजभान लक्षात घेऊन कै.अॅड.सखाराम नीजसुरे व कै.शेवंताबाई हरिभाऊ बारी यांचे स्मरणार्थ प्रा.टी.एच.बारी यांनी दिलेल्या देणगीतून हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी गौरव पत्राचे वाचन करण्यात आले. व्यासपीठावर हभप प.पू. सदगुरु प्रसाद महाराज , पुरस्कारार्थी विजय पवार, नागपूर येथील उपसंचालक कपिल पवार, नोबेल फाऊंडेशन जळगावचे जयदीप पवार, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, उपाध्यक्षा सौ.माधुरी भांडारकर, सचिव प्रकाश वाघ उपस्थित होते. प.पू. सदगुरु प्रसाद महाराज यांचे हस्ते समईची ज्योत पेटवून सानेगुरुजी यांच्या पुतळ्याचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याबरोबरच पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयास सचिव प्रकाश वाघ यांनी भेट दिलेल्या प.पू. सदगुरु प्रसाद महाराज व पूज्य साने गुरुजी यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. व्यासपीठावर विराजमान मान्यवर व हास्यकवींचा सत्कारही करण्यात आला.
साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी प्रास्ताविक केले. सौ.वसुंधरा लांडगे यांनी सुत्रसंचालन केले. शिक्षिका ज्योती सोनवणे यांनी गौरव पत्राचे वाचन केले. आपले मनोगत व्यक्त करतांना जयदीप पवार म्हणाले की, पुरस्कारापेक्षा कार्यकर्ता भूमिका महत्वाची असते. दोन्ही पुरस्कारात तीच भूमिका दिसते. एक पुरस्कार म्हणजे वाळवंटात निसर्ग फुलविणाऱ्या सामाजिक कार्य करणाऱ्या अंबर्षी टेकडी ग्रुपचा. दुसरा पुरस्कार म्हणजे स्वतः पदरमोड करुन तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून रोजगार मिळवून देणाऱ्या श्रीमंत विचारांच्या निःस्वार्थ सेवेला. मनाचा गुरु.. तोच खरा गुरु असतो. एखाद्या कळसाला मुलामा देण्याचं काम या शहराने केले. अमळनेर शहरात शिक्षकांची व महिलांची मोठी चळवळ असून सहकार्य आणि शिक्षणाची सांगड आहे. यामुळे महाराष्ट्रात अमळनेरचे नाव पहिल्या यादीत येऊ शकेल असा विश्वास व्यक्त केला. कु.सुश्मिता अरुण चौधरी या विद्यार्थिनीनेही आपले मनोगत व्यक्त केले.
श्री विजय पवार म्हणाले की, मी स्वतः ला भाग्यवान समजतो. दिनांक ८ मे २०१६ ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु केले. ज्या ठिकाणी केंद्र सुरु केले त्याच संस्थेच्या आवारात मला मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यासाठी वाचनालयाचे मोलाचे सहकार्य मिळाले. माझ्या शिरसाळ्यातील प्रत्येक जण पाठीशी उभा राहिला. कधीही रविवारी सुट्टी न घेता कामात आनंद मिळविला. नागपूर येथील उपसंचालक कपिल पवार, नोबेल फाऊंडेशन जळगावचे जयदीप पवार, यजुर्वेद महाजन आदींचे यात योगदान आहे. कामातूनच आनंद मिळतो, निःस्वार्थपणे केलेले कामच दखलपात्र ठरल्याने उच्च स्थान प्राप्तहोते. स्पर्धा परीक्षा सोपी गोष्ट नसून यश हे हुलकावणी देते. साधारण दोन टक्के यशस्वी होतात. माझ्यामुळे कोणीही अधिकारी नसून त्यांचे प्रयत्न महत्वाचे, मी एक निमित्त होतो असं सांगत मला मिळालेल्या पुरस्काराने गती मिळेल. ज्यांच्या सहकार्याने इथपर्यंत पोहोचलो त्यांना मिळालेला पुरस्कार अर्पण केला.
श्रोत्यांनी वऱ्हाडी हास्य कवी संमेलनाचा मनमुराद आनंद घेतला. हास्य कवींमध्ये शेगाव येथील ABP माझा व सह्याद्री हास्य सम्राट नितीन वरणकर यांनी प्रत्येक भाषा आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ असल्याचे सांगत ‘मायबोली’ कविता म्हटली. अनेक शब्दांचा उलगडा केला. ‘पंगत’ कवितेत.. ‘पंगतीची भाऊ मानले.. अशी आवड मोठी..’, ‘ माला कोरा कागद आण.. संपून गेली शाई..’, ‘समाज सुधारक’ या कविता म्हटल्या.
अकोला येथील सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी प्रा.संजय कावरे यांनी ज्याचेकडे ऐश्वर्य असतं तोच झुकतो.. झाडांना फळं असली की तेही आपोआप झुकते असे सांगत शेतीमातीतली कविता.. ‘ माहे वावर वावर..’ , तसेच ‘जातं’ या कवितेतून जातं आळस दूर करतं असे सांगत ‘जातं फिरे गरगर.. पीठ येई झरझर..’ या ओवी गात आईचं मोल सांगितले.
परतवाडा येथील वऱ्हाडी कवी गजानन मते यांनी ‘बाप घराचं कवाडं.. , ‘आम्ही माणसं मातीचे..’, ‘घरटे वाटते जुने जुने.. तू नसताना..’ या कवितांचे सादरीकरण केले.
परतवाडा येथील झी मराठी वऱ्हाडी कवी गौतमजी गुढधे यांनी उपस्थित मैफीलीला ओवीतून नमस्कार केला. वात्रटिका सादर करत ‘आजकालच्या जमान्यात भले भले पयले’ ही कविता म्हटली. एकंदरीत सर्वच कवितांना विनोदाची किनार असल्याने श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. संपूर्ण हॉल गर्दीने हाऊसफुल्ल होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.