समाज सुधारकांचे राहिलेले कार्य पूर्ण करायचे असेल तर शासनकर्त्यां वर मार्गदर्शक तत्वे निश्चित करुन तशी सक्ती आवश्यक : अॅड. रविंद्र गजरे
धरणगाव : तालुक्यातील पष्टाणे खुर्द येथील ग्रामपंचायत आवारात आज दिनांक २५ एप्रिल रोजी महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पष्टाणे खुर्द गावचे सरपंच शिवाजी सैंदाणे होते. सोबत व्यासपीठावर युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी, दयाराम पाटील, अॅड. रविंद्र गजरे, प्रेमराज पवार उपस्थित होते. मान्यवरांपैकी अॅड. रविंद्र गजरे यांचे हस्ते महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन उपस्थित मान्यवरांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा. अशोक पवार यांनी प्रास्ताविकातून राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानाबाबतची भूमिका सांगितली. यावेळी विद्यार्थीनी कु.गितांजली निवृत्ती ठाकरे व कु.राजश्री शशिकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी यांनी महापुरुष समजून घेण्यासाठी वाचन करण्याची गरज असल्याचे सांगत जाती व्यवस्था, अनिष्ट रुढी परंपरा, शिक्षण व्यवस्थेवर विचार मांडले. विधवा, सती प्रथा, बालगृहे विषयी माहिती दिली. श्री दयाराम पाटील म्हणाले की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जैविक बुद्धिवंत होते. त्यांचेमुळे बहुजनांना शिक्षण, सर्वांना मतदानाचा हक्क मिळाला. बाबासाहेब फक्त दलितांचे पुढारी नव्हते तर ते संपूर्ण देशाचे नेते होते. त्यांचं राष्ट्र उभारणीचं काम देशाला अचंबित करणारे असल्याचे सांगितले. श्री प्रेमराज पवार यांनी महात्मा फुले व डॉ आंबेडकर यांचे प्रसंग सांगत संविधानिक माहिती दिली.
अॅड. रविंद्र गजरे म्हणाले की, महात्मा फुले यांना मित्राच्या लग्नाचे आमंत्रण असताना वरातीवेळी अपमानास्पद वागणूक मिळाल्याने ते दु:खी झाले. यातूनच त्यांचा स्वाभिमान जागृत झाला आणि शोषितांसाठी चळवळ उभी राहिली. समाज सुधारकांचे राहिलेले कार्य पूर्ण करायचे असेल तर शासनकर्त्यां वर मार्गदर्शक तत्वे निश्चित करुन तशी सक्ती केली तरच बदल होईल असे सूचक वक्तव्य केले. अमळनेर येथील युवा कल्याण प्रतिष्ठान, पष्टाणे खुर्द ग्रामपंचायत व राजे ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन किशोर निकम, ललित पाटील यांनी केले. प्रेमराज पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.