परिवर्तनवादी कार्याची दखल घेत मिळाली पावती
अमळनेर : लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य समाजासमोर पोहोचावे, यासाठी राजश्री छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त पाचोरा येथील गो.से.हायस्कूल च्या आवारात महाराष्ट्र दिनी एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन आयोजित सामाजिक न्याय व सलोखा परिषद पार पडली. या कार्यक्रमात युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेेर चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांना नर्मदा बचाव आंदोलनाच्या व परिवर्तनवादी नेत्या मेधा पाटकर यांचे शुभहस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. सोबत विचार मंचावर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अविनाश पाटील, सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर, हमाल मापाडी संघटनेचे सुभाष लोमटे, प्रा.गणपत धुमाळे, साहित्यिक जयसिंग वाघ, खलील देशमुख आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात परिवर्तनवादी चळवळीतील छात्र भारती, राष्ट्र सेवा दल, शिक्षण चळवळ, असंघटित कामगार, आदिवासी शेतकरी आंदोलन, जेपी क्रांती आंदोलन आदी विविध कार्यासाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या दहा जणांना प्रातिनिधिक स्वरुपात सन्मानित करण्यात आले. प्राध्यापक अशोक पवार यांनी छात्र भारती, राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून पुरोगामी विचार रुजवित अनेक कार्यकर्ते घडविले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान झाला आहे. निवृत्तीनंतर आजही पुरोगामी विचार पेरण्याचे काम ते करत आहेत. युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत अमळनेेर तालुक्यात चांगले वक्ते घडविण्याचा त्यांचा मानस आहे. सहभागी सर्व वक्त्यांचे सहकार्याने फेब्रुवारी २०२३ मध्ये शिवजयंती पंधरवाडा साजरा केला. दिनांक ५ एप्रिल ते ५ मे महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती (मास) महोत्सव साजरा करीत आहेत. यातून थोर समाज सुधारक यांचे कार्याचा प्रचार व प्रसार करीत आहेत. कार्यक्रमास अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र, छात्र भारती, राष्ट्र सेवा दल, मराठा सेवा संघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सत्यशोधक चळवळ आदी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. दिव्यचक्र परिवारातर्फे अभिनंदन !