कवी जवळ शब्दसिध्दी असावी तरच ती फळारसाला येते : निळकंठ गायकवाड

अमळनेर : येथील पीबीए इंग्लिश मीडियम स्कूलच्या रोटरी क्लब हॉलमध्ये कवयित्री रेखा मराठे यांच्या ‘चतुरंग’ व ‘मुला फुलांची शाळा’ या दोन काव्यासंग्रहाचे प्रकाशन झाले. प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी माजी शिक्षणाधिकारी तथा डायट चे माजी प्राचार्य निळकंठ गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून खानदेश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी, मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश जोशी, कवी व साहित्यिक अशोक कोळी, डॉ. दशरथ साळुंखे, रमेश पवार, प्रा. अशोक पवार, रमेश धनगर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते साने गुरुजी, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन दीप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक खानदेश साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कुणाल पवार यांनी केले. डाएटचे अधिव्याख्याता डॉक्टर दशरथ साळुंखे यांनी कवयित्री रेखा मराठे यांचा परिचय करून दिला. साने गुरुजी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अनिता बोरसे यांनी ‘मुला फुलांची शाळा’ या काव्यसंग्रहाचा तर पूजा शहा यांनी ‘चतुरंग’ काव्यसंग्रहाचा परिचय करून दिला. वाल्मिक मराठे यांनी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमास नैतिकमुल्य व तत्व जपणारे व्यक्तिमत्त्व गायकवाड आप्पा अध्यक्ष म्हणून लाभले यांचा मनस्वी आनंद असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना त्यांना गहिवरुन आले. कवी अशोक कोळी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी म्हणाले की, पतीच्या भल्यासाठी महिला नेहमीच धडपड करीत असतात मात्र येथे पत्नीच्या भल्यासाठी पती महत्वाची भूमिका निभावली असे सांगत दोन्ही काव्यसंग्रहाचे रसग्रहण केले. तुकाराम महाराजांचा दाखला दिला. शब्द हे साहित्याचं धन असतं. आशयाची योग्य गुंफण, साधी सोपी भाषा देखील महत्वाची असते. एक अवस्था दुसरी किनारा. जनतेच्या व शासनकर्त्यांची भावना कवितेतून व्यक्त केली जाते. ग्रामीण भाषेला महत्व देत अमळनेरचा इतिहास शेती, निसर्ग, शाळा, मंगळग्रह मंदिर विषयाच्या कवितांतून मांडला आहे. अमळनेर ला सन २०२४ मध्ये सुमारे ७२ वर्षांनी साहित्य संमेलनाचा बहुमान मिळाला असून सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात निळकंठ गायकवाड यांनी ‘अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे..’ म्हणत सुरुवात केली. कशाचा विचार करायचा नाही.. डोक्याला ताण करायचा नाही., पुत्र व्हावा ऐसा गुंडा.. तिन्ही जगी असावा झेंडा या ओळीतला विचार काय..? ते स्पष्ट केले. कवी जवळ शब्दसिध्दी असावी तरच ती फळारसाला येते. दहा गावाभूत घटकांना स्पर्श करणाऱ्या कवितांची निर्मिती या कविता संग्रहातून आहे. वामनदादा कर्डक, सुरेश भट, विंदा करंदीकर यांच्या सोप्या कविता सादर केल्या. ते म्हणाले, कवितेतील शब्द हे हलकेफुलके असावेत जे सामान्य वाचकाला समजतात. सौ रेखा मराठे यांच्या काव्यसंग्रहातील शब्द अतिशय साधे सोपे आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोहर नेरकर, दत्तात्रय सोनवणे, रामकृष्ण बाविस्कर, रत्नाकर पाटील, उमेश काटे, श्रीमती पूनम साळुंखे, रत्ना भदाणे, रजनी पाटील, नूतन पाटील, क्रांती साळुंखे, पाकीजा पिंजारी यांनी सहकार्य केले. खानदेश साहित्य संघाचे सचिव शरद पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर तालुका उपाध्यक्षा सुनिता पाटील यांनी आभार मानले.