‘समतामुलक शिक्षणाचा पाया घालणारे महात्मा फुले’ या पुस्तकाचे झाले प्रकाशन; राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानातील सहभागी वक्त्यांचा गौरव
अमळनेर : एके काळी मंदिरात शुद्रांना प्रवेश नाकारला जात होता असे सर्वच जाणतात. गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांचे विचारांचा प्रसार व महात्मा फुले यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन मंदिरात होणं हाच खरा मोठा विचार आहे असे मत साहित्यिक जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले. बुध्द जयंतीदिनी दि.५ मे रोजी अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात युवा कल्याण प्रतिष्ठान संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत महात्मा जोतीराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मास महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी एच. टी. माळी होते. सोबत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी विश्वासराव पाटील, योगेश मुंदडे, प्राचार्य ए.बी. जैन, डिगंबर महाले, प्रा. अशोक पवार, प्रा. लिलाधर पाटील होते. मान्यवरांच्या हस्ते गौतम बुद्ध, महात्मा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन व बुध्द वंदनेने कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी बापूराव ठाकरे यांनी भगवान बुध्दांवर आधारित गाणे गायिले.
प्रास्ताविकातून प्रा. अशोक पवार अभियानाची भूमिका मांडताना म्हणाले की, आम्ही थोर समाजसुधारक यांच्या विचारसरणीतून अभियान राबवित आहोत. समाजाला मानवतावादी विचार द्यावे, नवं नेतृत्व निर्माण व्हावं, पुरोगामी विचारांनी जयंती साजरी व्हावी, गुणवत्तेचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे यासाठीचा हा प्रयत्न आहे. कार्यक्रमात सत्कार करताना पुस्तकेच भेट म्हणून द्यावीत असा संदेश त्यांनी दिला. जर आपण योग्य असू तर घटनेची मोडतोड कोणी करुच शकत नाही. येणाऱ्या २६ जूनला राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त १०० ठिकाणी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर साहित्यिक जयसिंग वाघ लिखित ‘समतामुलक शिक्षणाचा पाया घालणारे महात्मा फुले’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. विचार अभियानात सहभागी सर्व वक्त्यांना सन्मान पत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मनोगतातून विश्वासराव पाटील यांनी युवा कल्याण प्रतिष्ठान चे मोफत वक्ते घडवण्याचे काम वाखाणण्याजोगे असून सुसंस्कृत शिक्षण गरजेचे आहे. तालुक्यातील शाळांमध्ये अशा व्याख्यानाद्वारे समाज सुधारकांचे विचारांचा प्रसार करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करु असे सांगितले. प्रा. लिलाधर पाटील यांनी विचाराअंती बदल होत असतात असे सांगत बुध्द विचार मांडले. तालुक्यात सुरु असलेले हे विचार अभियान जिल्हाभर राबविले जाईल असा आशावाद व्यक्त केला.
जयसिंग वाघ पुढे म्हणाले की, बुद्ध जयंतीचे दिवशी एका मंदिरात महात्मा फुले यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन हा योगायोग म्हणावा लागेल. धर्मचिकित्सा करणारे, समता व न्यायाचे तत्वज्ञान मांडणारे गौतम बुद्ध यांचेनंतर दुसरे नाव म्हणजे महात्मा फुले. कोणाचाही द्वेष करायचा नाही, आपल्या सद्द्विवेक बुध्दीला जे मान्य असेल तेच करा हा गौतम बुद्ध यांचा सिद्धांत होता. स्वतःच्या बुध्दीचा वापर न करता दुसऱ्याने जे शिकवलं, सांगितलं तेच आम्ही अमलात आणलं यामुळे मतिमंद बनलो. यासाठी मान्य असेल तेच करावं. तोडणे सोपे असून जोडणे कठीण असल्याचे सांगत अंगुलीमाल डाकू वाल्मिकी कसा झाला ? ही गोष्ट सांगितली. ज्या एके काळी मंदिरात शुद्रांना प्रवेश नाकारला जात होता. मात्र आज गौतम बुद्ध, महात्मा फुले, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांचे विचारांचा प्रसार व महात्मा फुले यांच्या जीवनावरील पुस्तकाचे प्रकाशन मंदिरात होणं हाच मोठा विचार आहे. राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत युवा कल्याण प्रतिष्ठान चे हे यश आहे. हा क्रांतीकारक बदल असून याची इतिहासात नोंद होऊ शकते असे सांगून वैचारिक चळवळीला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल निकम यांनी तर आभार प्रा. अशोक पवार मानले. कार्यक्रमास मनोहर निकम, अरुण देशमुख, डी. ए. धनगर, वैशाली शेवाळे, अॅड. तिलोत्तमा पाटील, रामेश्वर भदाणे, बापूराव ठाकरे, प्रेमराज पवार, दयाराम पाटील, गौतम मोरे, संजय सूर्यवंशी, चेतन जाधव, सोपान भवरे, अशोक पाटील, वाल्मिक मराठे, उमेश काटे, ईश्वर महाजन, संदीप खैरनार, रविंद्र मोरे, रियाजभाई, शिक्षक, पालक, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विचार अभियानात सहभागी सर्वांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमानंतर श्री मंगळग्रह मंदिर संस्थान तर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.