शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दिले कृषी अधिकारी यांना निवेदन

पारोळा : येथील कृषी केंद्र संचालक हे शासनाने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने बि बियाणे विकत असल्याचे शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शेतकरी संघटनेला सांगितले. बील शासकीय दरानेच दिले जाते परंतु खाजगी दर जास्तीचा घेतला जातो. तशा बिलाची मागणी केली तर बियाणे शिल्लक नाही अशी उत्तरे दिली जातात. लागवडीचे दिवस असल्याने शेतकरी चा नाविलाज होऊन जातो. तक्रार कोणाकडे करावी ? हे सुद्धा कळत नाही. कळलेच तर कामांची व लागवडीचे नियोजन असल्याने तो कुठेही तक्रार न करता दुकानदाराकडून सरळ सरळ लुटला जात आहे. या पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील कृषी केंद्र संचालकांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून पारोळा पंचायत समितीचे कृषी अधिकारी दिनेश कोते यांचेशी सविस्तर चर्चा करुन त्यांना लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी पारोळा तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील भडगाव तालुका अध्यक्ष अभिमान हाटकर, पारोळा शहर युवा प्रमुख अनिल पाटील, महाळपूर शाखाप्रमुख शांताराम पाटील, सोबत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पारोळा शहर कृषी क्षेत्रातल्या बि बियाणे, रासायनिक खते, औषधी यासाठी खानदेशातील मोठी बाजारपेठ असून याचा फायदा हा शेतकऱ्यांना होणे अपेक्षित आहे. परंतु असे न होता शेतकऱ्यांची लूट सुरु आहे. यामुळे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अचानक कृषी अधिकारी दिनेश कोते यांच्यासमवेत पारोळा शहरातील पाटील ऍग्रो, संदेश कृषी सेवा केंद्र, आनंद फर्टीलायझर, गायत्री कृषी सेवा केंद्र, संजय कृषी सेवा केंद्र या दुकानांना प्रत्यक्ष भेट देत शेतकऱ्यांचे अभिप्राय जाणून घेतले. बियाणे खरेदी करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून पडताळणी करण्यात आली. चौकशी केली असता असे लक्षात आले की, शासन यंत्रणा या सर्व लॉबी च्या दावणीला बांधली आहे. कृषी अधिकारी समोर असतांना देखील स्टॉक लिहिलेले नव्हते. विचारले असता, न पटणारे उत्तरे देत होते. जर शासकीय अधिकारी यांनाही ही लॉबी जुमानत नसेल तर सर्व सामान्य शेतकऱ्याचे काय होत असावे ? शेतकऱ्यांची सरळ सरळ फसवणूक आणि लूट करताना दिसत आहेत. शासनाने कापसाच्या प्रती बँग ८५३ रुपये हा दर ठरवलेला असून पारोळा तालुक्यातील कृषी केंद्र संचालक हे काही विशिष्ट प्रकारच्या वाणांची बँग १२०० ते १५०० रुपये पर्यंत विक्री करताना दिसत आहेत. शेतकऱ्याला गरज असल्यामुळे कृषी केंद्र चालकांकडून शेतकऱ्यांची लुट होत आहे. कृषी केंद्र संचालकांनी शेतकऱ्यांची ही आर्थिक लूट व न चालणारे नको ते वाण देऊन त्याच्या शेतीच्या वार्षिक उत्पन्नामध्ये घट निर्माण करण्याचे कटकारस्थान कृषी संचालक करताना दिसत आहेत. यावर शासनाने गंभीर दाखल घ्यावी तसे न झाल्यास महाराष्ट्र शेतकरी संघटना शांत बसणार नाही. जर का अशीच लूट चालू राहिली तर या लोकांना संघटना त्यांची जागा दाखविल्या शिवाय राहणार नाही आणि याचे परिणाम खूपच गंभीर असतील असे मत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी व्यक्त केले. कृषी अधिकारी दिनेश कोते यांनी सांगितले की, जर का अशा कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांची लूट, फसवणूक होत असेल तर त्यांनी तात्काळ शासनाकडे अर्ज करावा. त्याची लगेचच दखल घेऊन संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
