महापुरुषांचे दैवतीकरण करायचे नसून त्यांचे विचार समाजात रुजविणे ही काळाची गरज : संजय सूर्यवंशी

महात्मा फुले हायस्कूल, देवगाव देवळी येथे युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान

अमळनेर : सर्व समाज सुधारक एकाच विचारधारेचे असून व्यापक स्वातंत्र्य आंदोलन, शिक्षण चळवळ, समाज व्यवस्था बदलण्यासाठी त्यांचे योगदान आहे. सर्वांवर एकमेकांचा प्रभाव आहे. मात्र जातीय व्यवस्थेने त्यांना स्वतंत्र करुन टाकले आहे. त्यांना विशिष्ट जातीत बसवले जाते ही शोकांतिका आहे. या महापुरुषांचे दैवतीकरण करायचे नसून त्यांचे विचार समाजात रुजविणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. अमळनेर तालुक्यातील देवगाव देवळी येथील महात्मा फुले हायस्कूल येथे युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपशिक्षक अरविंद सोनटक्के होते. सोबत विचार मंचावर शिक्षक एस.के.महाजन, एच.ओ.माळी, लिपीक एन.जी.देशमुख, विद्यार्थी वक्ता यश पाटील उपस्थित होते.

संजय सूर्यवंशी पुढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांनी नेहमीच प्रजेचा विचार केला. आरक्षणाची घोषणा, संगीत, शिक्षण क्षेत्रात योगदान दिले. शाहूंची प्रेरणा घेत अनेकांनी मोठ्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. प्रजेसाठी दुष्काळात अन्नधान्याची सोय करुन रयतेचं राज्य चालवलं. अनेक पैलवान घडविले. होस्टेल उभारुन राहण्याचा प्रश्न मिटविला. पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी भूकंप विरहित राधानगरी धरण बांधले. प्लेगची साथ असताना उत्तम आरोग्य सेवा दिली. अशा गोष्टी समाजात पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी थोरांचे चरित्र वाचून ते विचार पेरण्याची गरज असल्याचे सांगितले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना अरविंद सोनटक्के यांनी छत्रपती शाहू महाराज यांचे बद्दल विचार मांडले. राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत भविष्यात होणाऱ्या कार्यक्रमासाठी शाळेचे नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही दिली. विद्यार्थी वक्ते यश पाटील, पवन पाटील, कु. गायत्री भिल, जयश्री पाटील यांनी भाषणे केली. कु. रागिणी पाटील, मयुरी पाटील यांनी शाहू महाराज यांचे कार्यावर आधारित गीते गाऊन मने जिंकली. आज छत्रपती शाहू महाराज जयंतीला एकाच दिवशी १०० ठिकाणी व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करुन युवा कल्याण प्रतिष्ठान ने आपलं वेगळेपण सिद्ध केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एच.ओ.माळी यांनी तर एस.के.महाजन यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!