दूरदृष्टी असणारा लोककल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज : दयाराम पाटील

अमळनेर : येथील पी. बी. ए इंग्लिश मिडीयम शाळेत नुकतीच छत्रपती शाहू जयंती संपन्न झाली. दूरदृष्टी असणारा लोककल्याणकारी राजा म्हणजे छत्रपती शाहू महाराज असल्याचे प्रतिपादन दयाराम पाटील यांनी व्यक्त केले. युवा कल्याण प्रतिष्ठान तर्फे राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सोबत विचार मंचावर महाराष्ट्र पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष तथा दिव्यचक्र चे संपादक संजय सूर्यवंशी, शाळेच्या पर्यवेक्षिका एम. एस. बारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पर्यवेक्षिका एम. एस. बारी यांनी प्रास्ताविक केले.

श्री दयाराम पाटील पुढे म्हणाले की, जे आपल्याला कळायला हवं ते पाश्चिमात्य देशांमधील लोकांना कळतं. तेथील लोक थोर समाज सुधारकांचे कार्य विचारात घेऊन त्यांना पूजतात. बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना छत्रपती शाहू महाराज यांनी अनेक शिक्षणसंस्था व होस्टेल्स उभ्या करुन वंचित शोषितांना न्याय देण्याचे काम केले. यामुळे हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून संबोधतात. यामुळे छत्रपती शाहूंना समजून घेण्याची गरज आहे. सत्यशोधक चळवळीचा प्रभाव असल्याने त्यांनी आरक्षण मिळवून दिले. शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात योगदान दिले. अनेक उपाधींचा उल्लेख करताना मातीशी नाड जुळवून ठेवणारा, दूरदृष्टी असणारा, दलितांचा कैवारी, काळाच्या पुढे विचार मांडणारा,भटक्या विमुक्त जातीच्या लोकांना पोटाशी धरणारा, गुन्हेगारी जमात हा कलंक पुसणारा, शेतकऱ्यांसाठी झटणारा, समाज परिवर्तनासाठी आपलं उभं आयुष्य वेचणारा जाणता राजा लोककल्याणकारी राजा राजर्षी शाहू महाराज असल्याचे सांगितले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांचे वैचारिक संबंधावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी देखील शाहू महाराज यांचे कार्यावर आधारित भाषणे केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रशांत वंजारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे चेअरमन डॉ. संदेश गुजराथी, मुख्याध्यापक जे. एस. देवरे, पर्यवेक्षिका एम. एस. बारी, पी. व्ही. बडवे, व्ही. एस. अमृतकर, प्रशांत वंजारी, विनायक सुर्यवंशी, एस. आर. पाटील, एल. एच. पाटील, तेजश्री चव्हाण, सुवर्णा बोहरे, स्वाती माळी, डिंपल देसाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.