नजरेच्या आड असणाऱ्यांच्या व्यथा मांडत वास्तव साहित्य लेखन करुन अण्णाभाऊ साठे यांनी सर्वसामान्यांना जगण्याचं बळ दिलं : प्रा. डॉ. विजय तुंटे

अमळनेर : महाराष्ट्रच नव्हे तर गोवा मुक्ती संग्रामात ज्यांनी योगदान दिलं, समाज प्रबोधनाची भूमिका पार पाडली अशा साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे नाव महाराष्ट्राच्या यादीत वगळले जाते ही शोकांतिका आहे. शोषितांच्या व नजरेच्या आड असणाऱ्यांच्या व्यथा मांडत अण्णाभाऊंनी वास्तव साहित्य लेखन करुन सर्वसामान्यांना जगण्याचं बळ दिले असे विचार प्रताप महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. विजय तुंटे यांनी व्यक्त केले. ते धनदाई महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात युवा कल्याण प्रतिष्ठान, अमळनेेर संचलित राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत आयोजित वक्त्यांच्या कार्यशाळेत ‘अण्णाभाऊ साठे – जीवनपट’ विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा अशोक पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री हरिश्चंद्र कढरे यांनी क्रांतीगीत म्हटल्यावर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. चोपडा समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ. राहुल निकम यांनी प्रमुख मार्गदर्शक प्रा. डॉ. विजय तुंटे यांचा परिचय करुन दिल्यावर प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व पुस्तक देऊन स्वागत केले.
प्रा. डॉ. विजय तुंटे पुढे म्हणाले की, समाज सुधारकांविषयी नवं काही सांगितलं गेलं पाहिजे. सन १९४२ मध्ये अमळनेेर चे नऊ जण हुतात्मा झाले. त्यावर आण्णाभाऊ साठे यांनी पोवाडा रचला. ब्रिटिशांचा लढा आपल्या लेखन साहित्यातून शब्दबध्द केला. त्यांचे साहित्यातून शोषित व नजरेच्या आड असणाऱ्यांच्या व्यथा मांडल्या, विविध जातीधर्मास न्याय दिला. स्त्रीयांचा सन्मान केला पाहिजे अशी मांडणी वैजयंता मध्ये केली. त्यांचे साहित्य कल्पित नसून वास्तव साहित्य आहे. त्यांचेवर गौतमबुद्ध, संत कबीर, क्रांतीसिंह नाना पाटील, मार्क्सवाद, आंबेडकर वादाचा प्रभाव होता. १९४२ ते १९६५ हा अण्णाभाऊंचा सुवर्णकाळ. कोणतीही कौटुंबिक पार्श्वभूमी, वारसा, सुविधा नसताना स्वनिर्मित साहित्य लेखन केले. निरक्षर अण्णाभाऊ अनुभवाच्या बळावर साक्षर झाले. शोषितांचा लढा पाहिला. टिटवाळा शेतकरी परिषद, संयुक्त महाराष्ट्र परिषदे चं नेतृत्व केले. परिघाबाहेर असणाऱ्यांना परिघात आणून ओळख करून देण्याचं काम केलं. सामान्य माणूस, गरीब हेच त्यांचे श्रध्दास्थान. सन १९४२ मध्ये लालबावठा पथकाची निर्मिती करुन मिल कामगारांचे प्रश्न सोडविले. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चतु:सुत्रीवर भर असायला हवा. एकूणच अण्णाभाऊ साठें वर संशोधन व्हावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.
समारोपीय मनोगतात प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठें चे नाव महाराष्ट्राच्या यादीत वगळले जाते ही शोकांतिका आहे. राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियानांतर्गत समाजात प्रचार व प्रसार केला जाईल असे सांगितले. वावडे शाळेचे विज्ञान शिक्षक निरंजन पेंढारे यांची तालुका विज्ञान मंडळाच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार संजय सूर्यवंशी यांनी तर आभार प्रा. डॉ. लिलाधर पाटील यांनी मानले. यावेळी मौर्य क्रांती सेना चे राज्य उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत गुरुजी, माजी गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे, प्रा. लिलाधर पाटील, सौ.वसुंधरा लांडगे, उमेश काटे, निरंजन पेंढारे, राष्ट्रीय विचार प्रबोधन अभियान चळवळीचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.