
पुणे : निसर्गकवी व जेष्ठ साहित्यिक ना. धों. महानोर यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. पुणे येथील रुबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेथेच आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे. उद्या औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पळसखेड या गावी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण पळसखेड, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे झाल्यानंतर जळगावातील महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला; मात्र त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पहिल्या वर्षापर्यंतच झाले. महाविद्यालयीन शिक्षण सोडून शेती करायला ते आपल्या गावी परतले.
श्री महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां’ना मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून-कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायचं. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीतं लिहिली, तशा ठसकेबाज लावण्याही लिहिल्या. ते संत साहित्याचे गाढे अभ्यासक होते. प्रगतीशील शेतकरी म्हणूनही ते ओळखले जात.
