खवशी येथील जवान नरेंद्र सूर्यवंशी (सीआरपीएफ) भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त; ग्रामस्थांतर्फे झाला सत्कार

भावी काळात तालुक्यातील माजी सैनिकांच्या सोयीसाठी प्रशस्त कार्यालय उभारण्याचा जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड. ललिता पाटील यांचा मानस.

अमळनेर : तालुक्यातील खवशी येथील जवान नरेंद्र प्रकाश सूर्यवंशी भारतीय सैन्य दलातून आपल्या २१ वर्षाच्या सेवेनंतर दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सेवानिवृत्त झाले. त्या निमित्ताने खवशी ग्रामस्थांच्या वतीने दिनांक ३ ऑगष्ट २०२३ रोजी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खवशी येथील माजी सैनिक भालेराव रतन सूर्यवंशी यांना स्थान देण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिजाऊ बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता शाम पाटील यांचेसह गावच्या सरपंच सौ. जयश्रीताई अरुण देशमुख, आजी माजी सैनिक व जवान नरेंद्र यांचे आई व वडील उपस्थित होते.

अमळनेर येथील रेल्वेस्थानकावर सकाळी ९ वाजता आगमन झाल्यानंतर सजविलेल्या गाडीतून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे अभिवादन करुन मुंदडा नगर अमळनेर येथील निवासस्थानी भेट घेतली. अमळनेर येथील खान्देश रक्षक दलाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. तेथून खवशी येथे मूळ गावी आगमनानंतर छत्रपती शिवराय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास माल्यार्पण व वंदन केले. यानंतर गावाच्या प्रवेश द्वारा पासून घरापर्यंत डी. जे. व फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूकी दरम्यान अनेक सुवासिनींनी सेवानिवृत्त जवानाचे औक्षणही केले. यावेळी खवशी जि. प. मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भारत मातेचा जयघोष करीत उपस्थित नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. सकाळपासून घरोघरी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदनाचे पोस्टर्स लावण्यात आले होते. कार्यक्रमस्थळी जवानाचा सत्कार सोहळा आयोजन करण्यात आले होते. विविध संस्था, पदाधिकारी, आप्तेष्ट, ग्रामस्थ यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खेडी येथील जिजाबराव पाटील सर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत झाल्यानंतर सेवानिवृत्त जवान नरेंद्र सूर्यवंशी यांचा ॲड. ललिता पाटील यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. ॲड ललिता पाटील व अरुण देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन प्रसाद कापडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार सेवानिवृत्त जवान नरेंद्र सूर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमा नंतर भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कार्यक्रम यशस्वितेसाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!