खौशी येथे नव्या वसाहतीत पक्के रस्त्यांअभावी चिखलाचे साम्राज्य; माणूसच काय.. मुक्या जनावरांचेही होताहेत हाल

मुलभूत गरजा नसताना नुसतेच सुशोभीकरण काय कामाचे ?

अमळनेर : स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत जी बाब पूर्णत्वास जायला हवी होती तसे होताना फारसे दिसत नाही. या मिशनचा बट्ट्याबोळ झाला आहे. या संदर्भात खौशी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. विद्यमान स्थितीत गावातील मूलभूत समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. ज्या प्रकारे स्वागत कमानी, चौक सुशोभीकरण, समाज मंदिर बांधकामाकडे लक्ष दिले जाते तसेच गाव स्वच्छता व गावातील अंतर्गत रस्त्याच्या कामांकडेही लक्ष देण्याची गरज आहे. अतिक्रमणे वाढल्याने गल्लीतून मोठे वाहन निघत नाही अशी स्थिती आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. गावात मुलभूत सोयी सुविधा रस्ते, पाणी, वीज ही खरी गरज असताना नुसतेच सुशोभीकरण काय कामाचे ? गावकऱ्यांना मुलभूत सोयी सुविधा पुरविणे हे ग्रामपंचायत प्रशासनाचे खरे काम आहे. जर सोयी सुविधा नसतील तर रहिवाशांनी मालमत्ता कर कां भरावा ? असा प्रश्न पडतो.

ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छतेच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ऐन पावसाळ्यात नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. नेहमीच्या जागी गावात स्वच्छता केली जाते, यात दुमत नाही. परंतु गरीबांच्या तक्रारींची दखल कोण घेणार ? यातही मतांचे राजकारण केले जाते. गावात जेथे रस्ता आहे तेथे नाली नाही आणि जिथे नाल्यांची अत्यंत आवश्यकता आहे तिथे काम हाती घेण्यात आले नाही. गट क्र. २४४/१ मधील नव्या वसाहतीत एन.ए. रहिवासी प्लॉटमध्ये स्वतःचे मालकीची जागा सोडून अन्य खुल्या जागेत व रस्त्यावर उकिरडे केले जात आहेत. त्यामुळे अंतर्गत रस्त्यावर घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. पावसाळ्यात ही समस्या अधिक बिकट बनली आहे. गट क्र. २४४/१ मधील एन.ए. झालेली विकसक जागा (खुला प्लॉट) ग्रामपंचायतचे नावावर असताना त्या जागेवर देखील अतिक्रमण झाले आहे. यावरही ग्रामपंचायत प्रशासन मौन बाळगून आहे. नव्या वसाहतीत पक्के रस्ते नसल्याने रस्त्यांवर सर्वत्र चिखल होत असून माणूसच काय.. तर मुक्या जनावरांचे हाल पाहवत नाहीत. बैलगाडी चे अर्धे चाक चिखलात असते. स्वतः शेतकरी म्हणवून घेणाऱ्यांना तरी मुक्या जनावरांची कीव यायला हवी. घाणीने तुंबलेल्या नाल्यांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. ज्या वॉर्डांमध्ये नाल्या नाहीत अशा ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. ज्या ठिकाणी पाणी साचते तिथे विषारी श्वापदांचाही धोका कायम असतो. पाणी निघण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी किमान मुलभूत गरजांकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!