सानेगुरुजी विद्यालयाच्या एस. एम. गोरे सभागृहात पद्मश्री ना.धों.महानोर यांना आदरांजली वाहण्यासाठी झाली शोकसभा

अमळनेर : येथील साने गुरुजी विद्यालयाच्या एस. एम. गोरे सभागृहात  पद्मश्री ना.धों.महानोर यांना आदरांजली वाहण्यासाठी नुकतेच काल दिनांक ६ रोजी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. अमळनेर येथील मराठी वाड्मय मंडळ, साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय, महाराष्ट्र साहित्य परिषद, मौर्य क्रांती संघटना, तालुका धनगर समाज, खानदेश साहित्य संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत शोकसभा झाली. या सभेप्रसंगी म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे अध्यक्ष दिलीप सोनवणे, भाऊसाहेब देशमुख, मसाप चे कार्यवाह रमेश पवार, मौर्य क्रांती संघटनेचे राज्य उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत गुरुजी, निवृत्त पोलीस निरीक्षक हिरामण कंखरे, संदीप घोरपडे, ॲड. ललिता पाटील, डॉ. अनिल शिंदे, डॉ. कुणाल पाटील, एस. डी. देशमुख, श्रीमती अनिता बोरसे, डॉ. मआहएश्वरई, डी. ए. धनगर, उमेश काटे यांचेसह  पद्मश्री ना. धों. महानोर यांच्यावर प्रेम करणारे बांधव उपस्थित होते. कार्यक्रमात ‘घन ओथंबून येती..’, ‘मी रात टाकली.. मी कात टाकली…’ अशा सदाबहार गाण्यांतून व मनोगतातून दिवंगत ना. धों. महानोर यांच्या आठवणी जाग्या केल्या.

संदीप घोरपडे म्हणाले की, सानेगुरुजी शाळेच्या उद्घाटनप्रसंगी पद्मश्री ना. धों. महानोर उपस्थित होते. ते फक्त निसर्गकवी नसून स्त्री सौंदर्य व स्त्री व्यथा एकत्र मांडून कविता करणारे कवी होते.
भाऊसाहेब देशमुख यांनी सानेगुरुजी वाचनालय उद्घाटन वेळचा प्रसंग सांगत महानोर दादांनी विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न पोटतिडकीने मांडले असल्याचे सांगितले. ॲड. ललिता पाटील म्हणाल्या की, जोपर्यंत सूर्य चंद्र राहतील तोपर्यंत दादा आपल्या सोबतच राहतील. महानोर दादांसारखे आमदार असते तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसत्या. ‘या नभाने या भूमीला दान द्यावे..’ या कवितेतून ते मातीतला माणूस असल्याचे दाखवून दिले.
अविनाश जोशी म्हणाले की, निसर्गकवी ना. धों. महानोर यांचे अ. भा. साहित्य संमेलनापूर्वी निधन होणं एक दुर्दैव असल्याचे सांगत ‘जैत रे जैत.. ‘ चित्रपटातील प्रसंग सांगितला. हिरामण कंखरे यांनी प्रार्थना म्हटली. महानोर दादा आमच्या कुटुंबासाठी देवमाणूस होते हे आठवणीतून सांगितले. यावेळी त्यांना गहिवरुन आले होते.
प्रा. रमेश माने म्हणाले की, वयाच्या १८ व्या वर्षी दादांनी केलेली पहिली कविता अजिंठा मध्ये प्रसिद्ध झाली. दादा कवी नव्हे तर कादंबरीकार देखील होते. माझ्या कविता संग्रहाला दादांनी पाठराखण दिल्याने मला कवी म्हणून ओळख मिळाली असे रमेश पवार यांनी सांगितले. डी. ए. धनगर यांनी दादांना कवितांचा हिमालय उपाधी देत त्यांनी चालून आलेली आमदारकी नाकारल्याचे सांगितले. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल अमळनेेर वासियांनी सत्कार केला त्या प्रसंगाची आठवण बन्सीलाल भागवत गुरुजींनी सांगितली. दिलीप सोनवणे, कुणाल पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. यानंतर उपस्थितांनी ना. धों. महानोर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करुन आदरांजली वाहिली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!