अमळनेरच्या श्रीमद् भागवत कथेला वादळ व पाऊसाचा अडथळा; भक्तांनी चक्क गोवर्धन उचलून धरला

भक्तांच्या श्रीकृष्णावरील श्रद्धेमुळे वादळ आणि पाऊस थांबला. सर्व काही सुरळीत होऊन गार वातावरणात कथेची रंगत अधिकच वाढत गेली

अमळनेर : येथील गलवाडे रोडवरील प्रतापमिल आवारात अयोध्या निवासी श्री गायत्री नंदनजी महाराज यांचे वाणीतून दि.१ सप्टेंबर पासून ११ सप्टेंबर पर्यंत श्रीमद् भागवत कथा सुरु आहे. यात दररोज ९० टक्के महिला व फक्त १० टक्के पुरुषांची हजेरी असते. पुराणातील देवराज इंद्र व श्रीकृष्णाची कथा अनेकांनी ऐकली आहे तोच प्रत्यय काल दि.६ रोजी अनेकांना अनुभवायला मिळाला. जीवन एक संघर्ष असून भगवान परिक्षा घेत असतो व त्यातून वाटही भगवानच दाखवितात असा मौलिक विचार अयोध्या निवासी श्री गायत्री नंदनजी महाराज यांनी भक्तांना दिला.

काल दुपारी २ वाजता श्रीकृष्ण जन्माष्टमी कथेस सुरुवात झाली. आकाशात ढग जमा होऊ लागले आणि बघता बघता दुपारी ३ वाजेच्या सुमारास जोरात वादळ व पाऊस सुरु झाला अन् या जोरदार वादळाने भक्तीत अडथळा आणला. वादळाने भक्त मंडप वर उडून जात असताना पुरुष भक्तांसोबत विशेष करुन महिला भक्तांनी न घाबरता मंडपाला काही काळ आपल्या हाताने खाली खेचून धरले. अमळनेरच्या श्रीमद् भागवत कथा कार्यक्रमाला आलेल्या भक्तांनी जणू चक्क गोवर्धन पर्वत उचलून धरला होता. आसनासाठीच्या गाद्या भक्तांनी एकत्र करुन सुरक्षित ठेवल्या. पाऊस बरसत असताना भक्तगण मांडवाखालीच थांबून मिळेल ती मदत करीत होते. हे दृश्य व भक्तांची श्रीकृष्णावरील श्रद्धा पाहून जणू इंद्रदेवाने माघार घेतली असावी अन् वादळ आणि पाऊस थांबला. पुन्हा तासाभराने सर्व काही सुरळीत होऊन गार वातावरणात कथेची रंगत अधिकच वाढत गेली. भक्त तल्लीन होऊन नाचत होते. सायंकाळी ६ वाजता संपणारी कथा रात्री ७.४५ पर्यंत सुरुच होती. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त वासुदेव, नंदलाल, यशोदामैय्या, श्रीकृष्ण यांचा संजीव देखावा करण्यात आला होता. उपस्थित भक्तांना / बालकांना चॉकलेट, खेळणी ची बरसात करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले.

वादळ व पावसामुळे सभा मंडपाचे नुकसान

कथा सुरू असताना दुपारी तीनच्या सुमारास आलेल्या वादळामुळे सभामंडपाच्या उत्तरेकडील भागाचे काही प्रमाणात नुकसान झाले. दुपारी भक्तगण असल्याने फारसे नुकसान झाले नाही. मात्र कथा संपल्यावर रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पुन्हा एकदा पाऊसाला सुरुवात झाली आणि पुन्हा एकच धांदल उडाली. सर्व इलेक्ट्रिक साहित्य, गाद्या व अन्य साहित्य सुरक्षित राहावे म्हणून ताडपत्री खाली झाकून ठेवावे लागले.

कथेचे ठिकाण बदलण्याची शक्यता

पुढील परिस्थिती लक्षात घेऊन दररोज होणारी पूजा, आरती आहे त्याच जागी होऊन कथा जवळच बजरंग पॅलेस च्या हॉलमध्ये घेण्यात येणार असल्याचे कळते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!