आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाणी मंगल कार्यालयात गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झाली बैठक

अमळनेर : गणेशोत्सवात ‘नो डीजे’ ही भूमिका असल्याने डीजे चा आग्रह न धरता भक्ती व पूजेचा संगम दिसू द्यावा असे आवाहन डीवायएसपी सुनिल नंदवाळकर यांनी केले. येथील वाणी मंगल कार्यालयात नुकत्याच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. सोबत व्यासपीठावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे, विकास शिरोळे, हरिदास बोरसे, महिला पीएसआय अक्षदा इंगळे, अनिल भुसारे, न. प. चे प्रशासनाधिकारी संजय चौधरी, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, महावितरण चे अधिकारी आदी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, गणेशोत्सव साजरा केला जात असताना श्रद्धापूर्वक भक्ती करा. गणेश मंडळाच्या परवानगीसाठी ऑनलाईन फॉर्म अवश्य भरा त्यासाठी जबाबदार अशीच कार्यकारिणी करा. आपापसातील वाद असतील तर ते आधी मिटवा. अकरा फुटापेक्षा कमी उंचीची आरास ठेवून पर्यावरण पूरक मूर्ती स्थापन करा. पावसाचे दिवस असल्याने मूर्ती स्थापनेचे शेड चांगले असावे. पाचव्या, सातव्या व नवव्या दिवशी विसर्जनाची वेळ रात्री दहा पर्यंत असेल तर फक्त अखेरच्या दिवशी बारा वाजेपर्यंत असेल वाद्य आवाजाची मर्यादा ओलांडू नका. विसर्जन मिरवणुकीत धक्का असलेली वाहने येणार नाहीत याची काळजी घ्या. अठरा वर्षाच्या आतील मुलांना गणपती विसर्जनासाठी घेऊ नका. सर्व मंडळांना एका ठिकाणाहून सुविधा मिळतील याचा आम्ही प्रयत्न करू आदी सूचना त्यांनी केल्या.
पोलीस निरीक्षक विजय शिंदे म्हणाले की, गणेशोत्सवात पोलीस प्रशासन तुमच्यासोबत आहे. आम्ही सर्व विभागाचे लोक उत्सवासाठी अहोरात्र मेहनत घेणार आहोत. गणेशोत्सवा दरम्यान चुकीचे वर्तन होता कामा नये, गणेशमूर्ती स्थापना करताना रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्या, कोणत्याही डीजेला परवानगी मिळणार नसून साऊंड सिस्टिम ची परवानगी रात्री दहा वाजेपर्यंत असेल, सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून समाजकारणास प्राधान्य द्या, प्रबोधनात्मक देखावे असावेत, देखाव्यातून वाद होणार नाही याची काळजी घ्या, अमळनेर आपले आहे याचे भान ठेवा, विसर्जन मार्गावर हुल्लडबाजी नको, वेळेचे भान असावे, अमळनेरला संस्कृती व विचारांचा वारसा असल्याने काही चुकीचे घडू देऊ नका, उत्साहात कोणते विघ्न घालू नका. सुख आणि समृद्धी देणारा हा देव असल्याने चांगली आराधना करून आनंदाने उत्सव साजरा करा अशा सूचना वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी केल्या. नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी पालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती दिली हरिदास बोरसे, विजय पाटील, पंकज चौधरी, राजेंद्र चौधरी यांनीही सूचना केल्या. या बैठकीस शहर व तालुक्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार बांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार गोपनीय शाखेचे शरद पाटील यांनी केले. बैठक यशस्वितेसाठी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.