
अमळनेर : माझ्या आपत्तीच्या काळात तुम्ही सर्वांनी मदत केली नसती तर माझे राजकीय पुनर्वसन झाले नसते अशा भावनिक शब्दात नामदार अनिल पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील जनतेचे ऋण व्यक्त केले. अमळनेर शहरातील विविध संस्था व समाजातर्फे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात रविवार दिनांक १० सप्टेंबर रोजी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार उन्मेश पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, बाजार समितीचे सभापती अशोक पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन मोहन सातपुते, तिलोत्तमा पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, विनोद पाटील, मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, ॲड. ललिता पाटील, डॉ. अविनाश जोशी, श्याम अहिरे, भोजमल पाटील, मातोश्री पुष्पाबाई पाटील, जयश्री पाटील, राजश्री पाटील, जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार, बाजार समितीचे उपसभापती सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

सर्वप्रथम मंत्री अनिल पाटील यांचे घरापासून सजविलेल्या बैलगाडीवर मिरवणूक काढण्यात आली. सोबत वीस बैलगाड्या सजविल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर फटाक्यांच्या आतषबाजीत जेसीबी मशीन ने मोठा हार घालून मंत्री अनिल पाटील यांचे स्वागत करण्यात आले. अमळनेर नागरी समितीतर्फे मोठा हार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर बाजार समितीचे संचालक, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी सत्कार केला. मंत्री अनिल पाटील पुढे म्हणाले की, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी त्याग केला नसता, स्वर्गीय उदय वाघ यांनी मदत केली नसती तर मी आमदार झालो नसतो अशी कबुली दिली. चौदा कोटी जनतेच्या विकासासाठी काम करणाऱ्या २९ मंत्र्यांमध्ये अमळनेरला संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे आभार मानले. पाडळसरे धरणाच्या मातीचे सोने करेल, तालुका विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे, ज्या खुर्चीवर जनतेने बसवले त्या खुर्चीची उंची वाढवण्याचे काम लोकप्रतिनिधींचे असते ते मी चोखपणे पार पाडेल. तालुका सुजलाम सुफलाम करण्यासाठी सिंचन वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी येत्या काळात धरणासोबत ६० बंधारे झालेले दिसतील असे सांगितले.
मनोगत व्यक्त करताना खासदार उमेश पाटील यांनी नामदार अनिल पाटील यांच्यात प्रशासन हलविण्याची क्षमता असून खानदेशातील बॅकलॉग ते खेचून आणतील असा विश्वास व्यक्त केला. ना. अजित पवार यांचा अनिल पाटील यांचेवर विश्वास आहे त्यांना विविध क्षेत्रातील कार्याचा अनुभव असल्याचे जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार म्हणाले. तालुक्याचे आपल्या हातात आहे वजन सत्तेचा उपयोग करून अनिल पाटील यांनी वज्रमूठ बांधावी अशी अपेक्षा माजी आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, सभापती अशोक पाटील, ॲड. ललिता पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सत्कार सोहळ्यात अमळनेर तालुका मराठा समाज, मराठा समाज महिला मंडळ, खानदेश शिक्षण मंडळ, अमळनेर अर्बन बँक, नगरपालिका, ग्राम विकास शिक्षण मंडळ, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, विद्रोही साहित्य संमेलन समिती, अमळनेर स्मारक समिती, जैन समाज, मुस्लिम समाज, कोळी समाज, ठाकूर समाज, लाडशाखीय वाणी समाज, बडगुजर समाज, आंबेडकर समाज, शिंपी समाज यांच्यासह विविध समाजिक संस्था, ग्रामपंचायत यांचेतर्फे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगंबर महाले यांनी केले.