विविध कार्यक्रमांचे आयोजन व मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण

अमळनेर : येथील मिल के चलो असोसिएशन या सेवाभावी संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ९ सप्टेंबर रोजी शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पहिल्या सत्रात ८:३० वा. अमळनेर तालुक्यातील विज्ञान शिक्षकांची कार्यशाळा होती. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जळगाव येथील नोबेल फाऊंडेशनचे संस्थापक जयदीप पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारची अग्रनामांकित विज्ञान शिक्षण संस्था आयसर (IISER), पुणे येथील संस्थापक शास्त्रज्ञ डॉ.अरविंद नातू उपस्थित होते. या कार्यशाळेत डॉ नातू यांनी विज्ञान शिक्षण आणि संशोधनातील संधी यावर शिक्षकांना मार्गदर्शन केले. जयदीप पाटील यांनी शिक्षकांना नोबेल पारितोषिक मिळवणारे मुले कसे घडवता येतील ? याबाबत मार्गदर्शन केले. जयदीप पाटील यांनी मिल के चलो संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक करत संस्थेसाठी नेहमी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. मिल के चलो असोसिएशनचे संस्थापक अनिरुध्द पाटील व कल्याणी पाटील यांनी संस्था नेहमीच शिक्षक व विद्यार्थ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहील असे आश्वासन दिले. त्यानंतर निवडक मुलांचे विज्ञान प्रदर्शन आयोजित केले होते. यात प्रामुख्याने नंदगाव, पिंगळवाडे, गडखांब व देवगाव-देवळी येथील जि.प.शाळांचे विद्यार्थी आणि वावडे येथील श्री बी.बी.ठाकरे हायस्कूलचे विद्यार्थी यांचे पोस्टर प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. सायंकाळी वर्धापन सोहळा सर्वांसाठी खुला करण्यात आला होता. यात विविध स्पर्धा व प्रदर्शनात विजयी मुलांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ.अरविंद नातू व बक्षिस वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षा जेष्ठ शिक्षणतज्ञ हेमाताई होनवाड यांच्या हस्ते बक्षिस वाटप करण्यात आले.

दोन्ही सत्रातील कार्यक्रमात शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती उल्लेखनीय होती. या कार्यक्रमात मिल के चलो संस्थेच्या विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थी व शिक्षक यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमात अमळनेर तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष निरंजन पेंढारे, कार्याध्यक्ष डी.के.पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, एस.डी.देशमुख, आर.एस.पाटील, जी.डी.पाटील, प्रमिला अडकमोल, भाग्यश्री वानखेडे यांनी विज्ञान मंडळातर्फे डॉ.अरविंद नातू यांचा सत्कार केला. सकाळ सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मार्गदर्शक दत्तात्रय सोनवणे व चंद्रकांत पाटील यांनी केले. सायंकाळच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सल्लागार तथा मार्गदर्शक निरंजन पेंढारे व उमेश काटे यांनी केले. उपस्थितांचे आभार संस्थेचे संचालक प्रकाश पाटील व सौ करुणा पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजनात संस्थेचे सदस्य सिद्धार्थ पाटील, सौ. प्राजक्ता पाटील, प्रा.विनायक पाटील, चेतन वैराळे, वैष्णवी ठाकरे, प्रिया ठाकरे, गोपाल गावंडे, सुनिल पाटील यांनी मोलाचे सहकार्य केले.