नोव्हेंबर अखेर होणार उत्तर महाराष्ट्रातील वधू-वर व पालक परिचय स्नेह मेळावा; साधला जाणार प्रत्यक्ष सुसंवाद
धुळे : येथील जिल्हा मराठा सेवा संघाच्या वधू वर सूचक व सामुदायिक विवाह कक्षाच्या माध्यमातून नोव्हेंबर २०२३ अखेरीस भव्य खान्देशस्तरीय वधू -वर,पालक परिचय मेळावा आयोजित करण्याचे नियोजन सुरू आहे. त्या अनुषंगाने वधू वर नोंदणी पुस्तकाचे वितरण व भिंतीपत्रकांचे अनावरण विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ संकुल, गरूड काॅलनी, पांझरा नदी किनारी मराठा सेवा संघाच्या कार्यालय धुळे येथे संपन्न झाले
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रुलर एज्युकेशन संस्था, फागणे चे अध्यक्ष मधुकर पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. शामकांत पाटील, डॉ. योगेश ठाकरे, डॉ. अमोल पवार, डॉ.राहुल बच्छाव, डॉ.समीर शिंदे, डॉ.नितीन पाटील, प्रा.रविंद्र निकम, प्रा. बी. ए.पाटील, उद्योजक दिपक अहिरराव आदी उपस्थित होते. कक्षाचे कोषाध्यक्ष डॉ. प्रा. सुनील पवार यांनी उपस्थित पाहुण्यांचा परिचय करून दिला. उपस्थित मान्यवरांचा सन्मान वधू वर कक्षाचे जिल्हाध्यक्ष पी एन पाटील, मराठा सेवा संघाचे सचिव एस एम पाटील, प्राचार्य व्ही.के.भदाणे, नितीन पाटील, प्रवीण पाटील, राजेंद्र मोरे, नितीन भदाणे यांच्या हस्ते जिजाऊंची प्रतिमा देऊन करण्यात आला.
उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नोंदणी प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात नोंदणी पुस्तिका वाटप करण्यात आले. वधू वर कक्षाचे सचिव एच. ओ.पाटील यांनी वधू-वर व पालकांचा परिचय मेळावा संबंधी नियोजनाबाबत माहिती दिली. खानदेशात ५० हून अधिक नोंदणी प्रतिनिधी कार्यरत असून वधू वर नोंदणी करीत आहेत. प्रचार प्रसारावर भर दिला जात आहे. उच्चशिक्षित मुले मुली सोबत शेतकरी शेतमजूर, छोटे व्यवसाय करणारे यांच्या नोंदणीस प्राधान्य दिले जात आहे. गेल्या वेळेस हिरे भुवन येथे संपन्न झालेल्या वधू वर परिचय मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला होता. यावर्षी देखील रेशीमगाठी वधू वर परिचय पुस्तक आकर्षक स्वरूपात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त विवाह योग जुळून यावेत यासाठी पालक जागृती अभियानवर भर दिला जात आहे. परिचय नोंदणीस कार्यालयात सुरुवात करण्यात आली आहे .
मनोगत व्यक्त करताना ॲड.शामकांत पाटील म्हणाले की, पालकांनी थोड्या अपेक्षा कमी करीत योग जुळन आणण्याचा प्रयत्न करावा. अनाठायी खर्च टाळावा. विवाह लावताना वेळेचे भान ठेवावे. नूतन पाटील यांनी देखील विचार व्यक्त करताना विवाह जुळवण्याच्या अडचणी विशद केल्या. सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात आहेत. निवृत्त उपशिक्षणाधिकारी डी. बी. पाटील, अविनाश पवार, डॉ. प्रा. सदाशिव सूर्यवंशी, डॉ. सुलभा कुवर, प्रा. वैशाली पाटील, नूतन पाटील, भिमराव पाटील, विनोद शिंदे, पी. सी.पाटील, मनोज पाटील, हेमकांत अहिरराव, नोंदणी प्रतिनिधी व सेवा संघाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.