निवेदक रंगकर्मी शंभू आण्णा यांनी कवी ना. धों. महानोर यांच्या आठवणी सांगत जीवनपट उलगडला
अमळनेर : कवी कधी मरत नसतो.. स्वर्गात वा नरकात जात नाही तर कवी हा कायम अजरामर असतो.. आपल्यातच. कविवर्य ना. धों. महानोर यांनी शब्दबद्ध केलेल्या कविता, गाणी ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. यामुळे आम्ही श्रध्दांजली न देता स्वरांजली अर्पण करीत आहोत असे रंगकर्मी शंभू आण्णा म्हणाले.. परिवर्तन संस्था (जळगाव) तर्फे कविवर्य ना. धों. महानोर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्रभर गाजत असलेला ‘हा कंठ दाटून आला’ या कविता व गाण्यांचा स्वरांजली कार्यक्रम येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात नुकताच पार पडला. मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे समारोपीय पुष्प दि. १९ ऑक्टोबर रोजी गुंफण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून परिवर्तन संस्था, जळगाव चे रंगकर्मी शंभू आण्णा, हर्षल पाटील, सुदीपता सरकार होते. मराठी वाड्मय मंडळाचे डॉ. अविनाश जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय संदीप घोरपडे यांनी करुन दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज, सरस्वती व निसर्ग कवी ना. धों. महानोर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर आयोजकांतर्फे मान्यवर व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
डॉ अविनाश जोशी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, पूर्वी दरवर्षी सुरुवातीला नवरात्र मध्ये नऊ दिवस कार्यक्रम असतं. हळूहळू ते आता पाच दिवसावर आले आहेत. सन १९५२ मध्ये पहिले मराठी साहित्य संमेलन झाले होते. पुन्हा सुमारे ७२ वर्षांनी हा योग अमळनेर साठी जुळून आला आहे. कवी मन आणि सामाजिक भान जपणं हे साहित्यिकाचे लक्षण आहे. आम्ही निमित्त आहोत. व्याख्यानमाला यशस्वीतेसाठी दरवर्षी नियोजन करताना सर्व साहित्यिक आणि माझे सतरा सहकारी यांचे सहकार्य असते. हळूहळू वाटचाल सुरु असताना आपण साहित्य संमेलनाचे फार मोठं पाऊल उचललं. संमेलनासाठी जळगाव जिल्ह्यात सगळ्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देऊन आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही सर्व कार्य सुरळीत चालू ठेवा असे आश्वासन दिले याबद्दल सगळ्यांना धन्यवाद दिले. अमळनेर येथे होणारे साहित्य संमेलन सर्व मिळून यशस्वी करावे असे आवाहनही केले.
हर्षल पाटील म्हणाले की, अमळनेरला सानेगुरुजींचा सांस्कृतिक वारसा आहे. अमळनेर ही सानेगुरुजींची कर्मभूमी व कोकण ही जन्मभूमी. यातून तयार झालेले मानवी रसायन महाराष्ट्रात मुले आणि युवकांना राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती ची प्रेरणा देणारे होते. या भूमिकेतून ते विद्यार्थी घडवत. अमळनेरच्या भूमीत फेब्रुवारी २०२४ मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे आणि ते आपल्या सगळ्यांच्या कष्टातून मेहनतीतून यशस्वी सुद्धा होईल असा आशावाद व्यक्त करत सगळ्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
रंगकर्मी शंभू आण्णा म्हणाले की, महाराष्ट्र साहित्य परिषदेने अमळनेरच्या याच भूमीत आयोजित केलेल्या संमेलनाच्या युवा संमेलनाध्यक्ष पदासाठी आमच्या सोबत असलेल्या हर्षल पाटील सारख्या तरुणाला संमेलनाध्यक्ष पदाचा सन्मान मिळाला होता. रंगकर्मी संदीप घोरपडे यांनी मुद्दा लावून धरल्यामुळे एका खानदेशी तरुणाला संमेलनाध्यक्ष पद मिळाले होते याची आठवण करुन दिली. जळगावातील नाटकं बंद पडलीत पण त्यातून निर्माण झालं परिवर्तन. परिवर्तन काय झालं ? हे एका ओळीत सांगायचे झाले तर पूर्वी जळगावात पुणे आणि मुंबईहून कार्यक्रम मागवायचे आता मात्र जळगावची परिवर्तन संस्था फक्त राज्यात नव्हे तर पर राज्यात देखील बाहेर कार्यक्रम देते आणि हे खरं परिवर्तन आहे. साने गुरुजी यांची पुण्याई अमळनेरला लाभल्यामुळे फेब्रुवारी २०२४ मध्ये संमेलन होणार आहे. संमेलनाचे आयोजन करणं सोपं काम नाही. कवी आणि लेखक जागली माणसं असतात. कौन बनेगा करोडपती मध्ये अमळनेरच्या शरद धनगर.. हा कवी डगमगला नाही हे त्यातलं उदाहरण. महानोर दादां यांच्या आठवणी सांगताना ते म्हणाले की, महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्या काळी वाहन सुविधा नसताना महानोर यांची पळसखेडा गावी बैलगाडीतून जाऊन भेट घेतली. साहित्य क्षेत्राला गती दिली. शरद पवार व जैन इरिगेशनचे भवरलाल जैन यांच्या मैत्री मुळे कवी महानोर देशाला कळले. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना त्यावेळी विधान परिषदेवर स्थान दिले जायचे. महानोर दादांना विधान परिषदेचे आमदार म्हणून स्थान देण्यात आले. त्याचा फायदा त्यांनी समाज व शेतकऱ्यांसाठी करून दिला. पाणी आडवा.. पाणी जिरवा, फळबाग ही योजना आणली. प्रेम करणं कवितेतून शिकवलं ते महानोर दादांनी. बोली भाषा कोणती वाईट नसते हे महानोर यांच्या कवितेतील मिश्र भाषांतून लक्षात येते. भेटी लागी जिवा लागलीस आत.., भूमी भेगाळली खोल ओल राहिली न कुठं.. , निघाली पालखी.., किती दिस आले गेले रुतलेल्या आठवणी.. अशी काही गीते कविता म्हटली.
प्रेम करणं कवितेतून शिकवलं ते महानोर दादांनी. संमेलनासाठी शुभेच्छा देत सांस्कृतिक परंपरा असलेल्या गावाला नमन करुन ‘खरा तो एकची धर्म.. जगाला प्रेम अर्पावे’ या गीताने स्वरांजली कार्यक्रमास खरी सुरुवात झाली. यात.. अक्षय, ऐश्वर्या परदेशी, वरुण नेवे, रमेश पवार, सुदीपता सरकार, सोनाली पाटील, हर्षल पाटील, आरुषी जोशी आदींचा सहभाग होता.
अक्षय यांनी.. खरा तो एकची धर्म.., गोर झालं असं एखादं पाखरु., ऐश्वर्या परदेशी यांनी.. नभ उतरु आलं.. अंग झिम्माड झालं (कविता), जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजती, मी रात टाकली मी कात टाकली, राजसा जवळ जरा बसा..(लावणी), भरलं आभाळ बाई श्रावणाची ऊन झेपेना (लावणी)., वरुण नेवे/ ऐश्वर्या परदेशी यांनी… चिंब पावसानं रान आबादानी.. , रमेश पवार यांनी.. या नभाने या भूमीला दान द्यावे आणि माझ्या पापण्यांना पूर यावे, वरुण नेवे यांनी … हा कंठ दाटूनी आला (अंगाई गीत), लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं, सुदीपता सरकार यांनी… जग जेठी भरली तिची ओटी (डोहाळे गीत), पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं, गेला माह्या जीव माले भित्तीशी कुटाडा. सोनाली पाटील यांनी… मोडलेल्या माणसांचे दु:ख झेलताना, हर्षल पाटील यांची… प्रेमकविता, आरुषी जोशींची… जन्मापासून चे दु:ख, बहिणाबाईंची कविता.. जीव देवानं धाडला जन्म अशा कविता गाणी सादर केली. ऐश्वर्या परदेशी यांच्या ‘सदा जगाच्या करिता चंदनापरी झिजला…’ या गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषद अमळनेेर चे पदाधिकारी, साहित्य क्षेत्रातील संदीप घोरपडे, भाऊसाहेब देशमुख, दिलीप सोनवणे, संजय चौधरी तसेच रमेश माने यांचेतर्फे शंभू अण्णांचा यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी उपाध्यक्ष : शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह : सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष : प्रदीप साळवे, कार्यकारिणी सदस्य : प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे आदींनी परिश्रम घेतले.
अभिवाचन कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन…
दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९.३० वाजता भाऊसाहेब देशमुख आणि संघ अभिवाचन करणार आहे. अभिवाचन कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब देशमुख यांनी केले.