आपण आनंद विकत घेऊ शकतो पण त्यात समाधानाची तृप्ती मिळत नाही : बालरोग तज्ञ डॉ. अभिनय दरवडे

‘विषमुक्त शेती.. रोगमुक्त भारत’ या संकल्पनेवर हर्षल बोरसे यांचे मनोगत

अमळनेर : समाधानाला जगण्याशी जोडता आलं पाहिजे. कशानं दुःखी व्हावं.. हे कळायला हवं. भवतालची दुःखे न दाखवता संघर्ष करणारी माणसे हे खरं समाधान. आपण आनंद विकत घेऊ शकतो पण त्यात समाधानाची तृप्ती मिळत नाही असे मत बालरोग तज्ञ डॉ. अभिनय दरवडे (धुळे) यांनी व्यक्त केले. मराठी वाड्मय मंडळ व आप्पासाहेब र. का. केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालयातर्फे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजित शारदीय व्याख्यानमालेचे ‘सांगा जगायचं तरी कसं ?’ या विषयावर चौथे पुष्प गुंफताना दि. १८ ऑक्टोबर रोजी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. सोबत व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील ग्रीन ग्लोब बायोटेकचे संचालक हर्षल गुलाबराव बोरसे तर मराठी वाड्मय मंडळाचे डॉ. अविनाश जोशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश माहेश्वरी यांनी केले. श्री श्यामकांत भदाणे यांनी प्रमुख वक्ते व पाहुण्यांचा परिचय करुन दिला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन, नटराज व सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर आयोजकांतर्फे मान्यवर व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक छगन पंढरीनाथ पाटील (मांडळ) यांचाही सत्कार झाला.

डॉ. अभिनय दरवडे पुढे म्हणाले की, माणूस भौतिक सुखासाठी धावत राहतो. दिखाव्याला महत्त्व देतो. साधं राहणीमान मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. याचा रोजच्या जगण्यावर प्रभाव पडतो. जगणं हल्ली अनुकरणातून सुरू झाले आहे. साहजिकच माणसातला निरागसपणा जाऊन आपण कोडगे बनलो आहोत. निरागसपणा संपला. सगळ्या क्षेत्रात ध्येयवाद संपला. माणसे गेली आता मुके संवाद झाले. शिक्षण व्यवस्था सुद्धा पोरकी झाली. तरी पण.. आपल्याला ती ‘सल’ बोचत नाही. जगणं महाग होत चालले आहे याला आपणच जबाबदार आहोत. सुशिक्षित तरुणांकडे अनेक प्रमाणपत्र जमा होतात पण कौशल्य शिकवलं जात नाही. यातून समाधान हरवलेले लाखो चेहरे पाहायला मिळतात. यासाठी आनंदाचं झाड लावायचे.. ते झाड जगण्याला सार्थकी होण्यासाठी आशिर्वाद देत असतं.

सर्व जबाबदारी सरकारची कशी ?
सरकारी योजनांतून भवताली शाळा, रुग्णालये, बगीचे आदी उभारण्यात येतात. तेथे आम्हीच अस्वच्छतेला कारणीभूत असताना.. सरकारची जबाबदारी कशी ? दुसऱ्याच्या जगण्यावर आनंदाचा थयथयाट काय कामाचा..? आपण लोक दुसऱ्याच्या जगण्यावर अतिक्रमण करतो. संवेदना बेचव, बोथट झाल्या. व्यावहारिक व सामाजिक भान विकसित करावे लागेल. असाही मुद्दा स्पष्ट केला.

कार्यक्रमांमध्ये जाताना महागडे कपडे परिधान करुन सेल्फी घेण्यातच काही मग्न असतात पण.. जिवंत माणसांचा एकमेकांशी संवाद नसतो. टीचभर दुःख आम्ही गावभर दाखवतो. कशानं दुःखी व्हावं.. हे कळायला हवं. दुःख न दाखवता संघर्ष करणारी माणसं हे खरं समाधान असतं. अशाच दहावीत शिकणाऱ्या ‘पुष्कर’ चा कोरोना काळात दोन वर्षे आजारपणाशी झालेला संघर्ष श्रोत्यांना विचार करायला लावणारा होता. पुष्कर चा भेट देऊन सत्कार करण्यात आला. दुसऱ्याच्या दुःखात धाऊन गेलं तर त्यात निश्चितच समाधान मिळते. कसं जगायचं ? हे त्यातून शिकायचं. राम माणूसकी वर प्रेम करीत असे त्यामुळे अजरामर आहे तर रावण माणसांवर प्रेम करत असे, तरीही रावण पराभूत झाला. कधी कधी पराभवातूनही शिक्षण होत असते.
तंत्रज्ञानाने माणसाला आळशी बनविले आहे. घरातली माणसं कमी होऊन कुत्रा, मांजर सारखी जनावरे घरात पाळतो. घरात आजी आजोबा नको आहेत. पुढच्या पिढीला उपदेशाचे डोस नको आहेत. यामुळे आनंद विकत घेऊ शकतात पण समाधानाची तृप्ती मिळत नाही. प्रेम वाटले तर प्रेम मिळेल.. द्वेषातून द्वेष मिळेल हे लक्षात घेतले पाहिजे. समाधानाला जगण्याशी जोडता आलं पाहिजे. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंती पेक्षा मोठी नाही. संवेदना हरवलेल्या समाजामध्ये नेमक्या संवेदना कशा पेरायच्या ? यावर आता परिषदा घेणं गरजेचे आहे. हे सांगताना कवितेतून व्यक्त झाले.

मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले,
कोणाला ताण आहे … कुणाला तणाव आहे /
सभोवताली दमलेला हा निर्जीव जमाव आहे,
स्वतंत्र झाली माणसे पण.. मेंदू बधिर झाले /
मरण झाले स्वस्त आणि जगणे महाग झाले //

कविवर्य ना. धों. महानोर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शारदीय व्याख्यानमाला समारोपीय कार्यक्रमात आज दि.१९ रोजी परिवर्तन संस्था (जळगाव) तर्फे महाराष्ट्रभर गाजत असलेला ‘कंठ दाटून आला’ या कविता व गाण्यांच्या स्वरांजली कार्यक्रमाने पुष्प गुंफले जाणार आहे.

मनोगत व्यक्त करताना हर्षल बोरसे म्हणाले की, सेंद्रिय शेती ही आजच्या काळाची गरज आहे. आपण जे काही खातो ते कुठून येते याचा विचार करायला हवा. व्यवस्थित विलीनीकरण केलं तर.. रासायनिक खते, औषधांमुळे जमिनीचा कस गमावला त्याबरोबरच शारिरीक धोकेही निर्माण झाले. यातून ‘विषमुक्त शेती.. रोगमुक्त भारत’ या संकल्पनेवर काम सुरु आहे. मी मूळचा चोपडा येथील असलो तरी एवढे नक्की की चोपड्यात लक्ष्मी चा तर अमळनेरात सरस्वती चा वास आहे. अशा पवित्र जागी रोगमुक्त भारतासाठी ‘जागरुक होऊ या..!’ असे सूचक विधान केले.

श्यामकांत भदाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठी वाड्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी उपाध्यक्ष : शामकांत भदाणे, रमेश पवार, कार्यवाह : सोमनाथ ब्रम्हे, नरेंद्र निकुंभ, शरद सोनवणे, कोषाध्यक्ष : प्रदीप साळवे, कार्यकारिणी सदस्य : प्रा. डॉ. पी. बी. भराटे, बन्सीलाल भागवत, संदीप घोरपडे, स्नेहा एकतारे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब मगर, प्रा. डॉ. सुरेश माहेश्वरी, प्रा. श्याम पवार, प्रा. शीला पाटील, स्वीकृत सदस्य अजय केले, बजरंगलाल अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे आदींनी परिश्रम घेतले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!