समस्त माहेश्वरी समाज, अमळनेर तर्फे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी) यांचा सत्कार

अमळनेर : आशिया खंडातील सहकार क्षेत्रात सर्वार्थाने प्रथम क्रमांकावर असलेल्या बुलडाणा अर्बन बँकेच्या शाखा अमळनेर येथील स्वमालकीच्या धान्य गोदामाचा उद्घाटन सोहळा आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांच्या शुभहस्ते फीत कापून नुकताच दि.४ नोव्हेंबर रोजी पार पडला. यावेळी संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ.अनिल शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सौ.तिलोत्तमाताई पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, नगरसेवक मनोज पाटील, प्रा. विश्वनाथ ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या शुभहस्ते भारत मातेचे पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. आदरणीय भाईजी यांच्या हस्ते आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
जळगाव खा.२ शाखेचे विभागीय व्यवस्थापक गोपालसिंग पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांना संस्थेच्या उपक्रमांबद्दल माहिती दिली. सहकाराला सामाजिक कार्याची जोड देऊन शहरी व ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजुर, व्यावसायिक, व्यापारी सभासद ग्राहकांची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगतीसाठी सदैव तत्पर बँकीग करतांनाच आर्थिक शिस्तीमुळे संस्थेने सर्वदूर प्रगती केल्याने बुलडाणा अर्बन बँक नावारुपाला आली असल्याचे सांगितले. समस्त माहेश्वरी समाज अमळनेर तर्फे मा.भाईजीचा सत्कार करण्यात आला यावेळी सहा.निबंधक मधुसूदन लाठी, लेखापरीक्षक विशालजी तोतला, योगेश मणियार, योगेश मुंदडा, पंकज मुंदडा, राकेश माहेश्वरी व समाजातील इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमास अमळनेर परिसरातील सभासद, शेतकरी, धान्य व्यापारी, विविध बँकेचे अधिकारी, राजकीय पदाधिकारी, ज्वेलर्स व विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जळगाव खा.२ चे विभागीय व्यवस्थापक गोपालसिंग पाटील, विभागीय व्यवस्थापक जळगाव खा.१ शाखेचे रमेश पवार, अमळनेर शाखेचे व्यवस्थापक विशाल धुमाळ व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.