‘डियर तुकोबा’ पुस्तकाच्या तासभर अभिवाचनात अमळनेरकरांनी तुकोबा अनुभवले

अमळनेर : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद अमळनेेर शाखेतर्फे रंगभूमी दिनाचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी नाट्यगृहात विनायक होगाडे लिखित व नाट्यकर्मी संदीप घोरपडे दिग्दर्शित ‘डियर तुकोबा’ या पुस्तकाचे अभिवाचन नुकतेच पार पडले. यावेळी ‘डियर तुकोबा’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. दोन वर्षात सहा आवृत्तीचं रेकॉर्ड करणाऱ्या या पुस्तकाचे प्रकाशनावेळी प्रा. अशोक पवार, आर्किटेक्ट चेतन सोनार, दिलीप सोनवणे, प्रा. बी. एन. चौधरी, सौ. घोरपडे, लेखक विनायक होगाडे उपस्थित होते. नाट्यकर्मी संदीप घोरपडे, भाऊसाहेब देशमुख, मेघा पाटील, सुनंदा पवार, योगिता पाटील यांच्या अभिवाचनाने व त्यांना साथसंगत करणाऱ्या योगेश पाटलांच्या बासरी वादनाने श्रोत्यांची मने जिंकली. लेखक विनायक होगाडे आपल्या मनोगतात म्हणाले की, मी ‘डियर तुकोबा’ लिहून मोकळा झालो, आता ही कलाकृती लोकांची झाली आहे. काय बोलावे ते शब्द सुचत नव्हते. ही कलाकृती समाजात कसे मांडतात ते कलाकारां वर अवलंबून असल्याचे सांगितले.

संत तुकाराम महाराज सर्वांनाच परिचित असून त्यांच्या अभंगाचा एखादा दाखला दिल्याशिवाय आणि ‘तुका म्हणे..’ उच्चारल्याशिवाय आपला दिवस जात नाही. मात्र, विनायक होगाडे यांनी आपल्या पुस्तकातून मांडलेला तुकोबा वेगळा आहे. सर्वसामान्यांना कळाले त्याहून भिन्न आहेत. रोखठोक, विद्रोही, मनात विचारांचे कल्लोळ-हल्लोळ माजविणारे आहेत. तुकारामायण, तुकोबांचे मिडिया ट्रायल आणि तुकोबांशी संवाद अश्या तीन भागात ती विखुरली आहे. त्यात श्रेष्ठ – कनिष्ठ वाद, वर्चस्वाचा अहंकार, अन्यायाची परिसीमा आणि तुकोबांचा संयम असा संघर्ष दमदारपणे साजेशी रंगभूषा करत एका तासाच्या अभिवाचनात सादरीकरण करण्यात आले. समकालाचं दर्शन घडवणारं नेपथ्य केलं. आणि, सुरु झाला एक थरारक, गुंतवून टाकणारा, प्रभावी अनुभव. संदिप घोरपडेच्या मुखातून येणारं तुकोबांचं सात्विक, निर्मोही, विद्रोही, त्यागी आणि तितकंच संयमी निवेदनातून साक्षात तुकोबाच रंगमंचावर वावरत होते. तो त्यांचा या क्षेत्रातील अनुभवाचा परिपाक होता. भाऊसाहेब देशमुख यांच्या अभिवाचनातला बेरकी, कुटील रामेश्वर भट, मंबाजी गोसावी तसेच मेघा पाटील, सुनंदा पवार आणि योगिता पाटील यांच्या मुखातून बहिणाई, जनाई आणि आवली इंद्रायणीगत वहात होत्या. अभंगांची गीतं होत होती. आर्तता, भक्ती आणि समर्पणाची नदी अवखळ वहात होती. त्यांच्या अभिवाचनाला योगेश पाटलांची बांसरी एकसंघ करत होती. देहूच्या पावित्र्याची अनुभूती देत होते. तुकोबा समजून सांगण्याचा चांगला प्रयत्न होता. कलावंतांनी केलेल्या छान सादरीकरणामुळे कार्यक्रम रंगत गेला. लेखक होगाडे यांना आपल्या शब्दांना असं रंगमंचावर वावरताना पाहणं, त्यांना अचंबित करत होतं. दुसऱ्याच्या नजरेतून आपलीच कलाकृती प्रत्यक्ष प्रयोगातून पाहतांना ते भारावले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डाॅ. रमेश माने यांनी केले. नटराज पूजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!