पिंगळवाडे जि.प.शाळेचा विद्यार्थी हेमंत चव्हाण ची आकाशवाणी वर ‘शाळा बाहेरची शाळा’ मध्ये निवड

अमळनेर : तालुक्यातील पिंगळवाडे येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी हेमंत रोहिदास चव्हाण याची नागपूर आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या ‘शाळा बाहेरची शाळा’ या कार्यक्रमाच्या ५३३ व्या भागासाठी निवड झाली आहे. जि.प.पिंगळवाडे शाळेतील हेमंत हा जिल्ह्यातून निवड झालेला एकमेव विद्यार्थी आहे. कोरोना काळापासून ग्रामीण भागातील विशेषत: जि.प.शाळेतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून नागपूर येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्रथम फाऊंडेशन यांचे वतीने राज्यस्तरावर राबविण्यात येणारा हा उपक्रम जि.प.जळगाव तर्फेही जिल्हास्तरावर राबविला जात आहे.

शालेय अभ्यासाच्या विशिष्ट टास्क बद्दल माहिती देण्यासाठीच्या भूगोल या विषयांतर्गत इयत्ता ६ वी ते ८ वी तील मुलांसाठी ‘कुक्कुटपालन व्यवसाय कसा करतात ? याची माहिती मिळवा’ या दिलेल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या जिज्ञासेतून हेमंत चव्हाण या विद्यार्थ्याची निवड झाली होती. कुक्कुुटपालन व्यवसाय या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची हेमंतने मोकळेपणाने उत्तरे दिली आहेत. शाळेच्या वर्गनिहाय व्हॉटस्अप गृपच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे प्रसारण नियमितपणे ऐकणे, प्रथम महाराष्ट्र ॲपच्या माध्यमातून विविध टास्क, थोडी मस्ती थोडा अभ्यास, रेडीओ प्रक्षेपण, निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत आॅडीयो व्हिडीओ यात शिक्षक-पालक व माता पालक गट यांचे मदतीने विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त सहभाग तसेच अमळनेर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांच्या प्रोत्साहनामुळे पिंगळवाडे शाळेला हा बहुमान मिळाला असे तंत्रस्नेही शिक्षक दत्तात्रय सोनवणे यांनी सांगितले.

आकाशवाणीवरुन आठवड्यातून मंगळवार, गुरुवार व शनिवार असे तीन दिवस सकाळी १०.३० वा. ‘शाळा बाहेरची शाळा’ हा कार्यक्रम नियमितपणे प्रसारित होत असतो. हेमंत चा सहभाग असलेल्या कार्यक्रमाचे प्रसारण (भाग- ५३३ वा) शनिवार दि.११ नोव्हेंबर २०२३ रोजी झाले. सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे शाळेच्यावतीने कळविण्यात आले आहे.

हेमंत ला यासाठी अमळनेर पं.स.च्या शिक्षण विस्तार अधिकारी कविता सुर्वे, अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, मुख्याध्यापिका वंदना ठेंग, शाळेतील शिक्षक दत्तात्रय सोनवणे, प्रविण पाटील, रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले. मुलाखतीसाठी प्रथम फाऊंडेशनचे जळगाव जिल्हा समन्वयक विकास निकुंभे व किरण वसावे यांचे मार्गदर्शन लाभले. हेमंत व त्याच्या आई-वडीलांचे जळगाव जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत साहेब, प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, अमळनेर तालुक्याचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील, पिंगळवाडे गावच्या सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, पोलीस पाटील गजेंद्र पाटील, सेवानिवृत्त प्रांताधिकारी भागवत सैंदाणे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रविंद्र देशमुख, उपाध्यक्षा मिना भिल, सर्व सदस्य तसेच गावातील पदाधिकारी, शिक्षणप्रेमी व ग्रामस्थ यांनी कौतुक केले आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!