विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा मराठी लाईव्ह न्युज च्या चौथ्या वर्धापनदिनी पुरस्कार देऊन गौरव

खऱ्या हिऱ्याला विलासराव पाटील यांच्यामुळे मिळालं कोंदण : पत्रकार डिगंबर महाले

दिव्यांगांच्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार स्विकारताना डॉ. योगेश महाजन व कुटुंबीय.

अमळनेर : सहजासहजी लक्ष्मी व सरस्वती एकत्र येत नाही असं मानलं जात असले तरी लक्ष्मीपूजनाचे दिवशी सरस्वती पुत्राना बोलावून सोहळा होणं हा शुभ संकेत आहे. मराठी लाईव्ह न्यूजने विनयशीलता, विवेक जपला आहे. संपादक ईश्वर महाजन सारख्या खऱ्या हिऱ्याला विलासराव पाटील यांच्या मुळे कोंदण मिळालं असे मत श्री मंगळग्रह सेवा संस्थान चे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांनी व्यक्त केले. मराठी लाईव्ह न्युजचा चौथा वर्धापन दिन रविवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२३ रोजी पूज्य साने गुरुजी वाचनालयात साजरा करण्यात आला त्यावेळी ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. विचार मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगर विकास प्राधिकरण चे उपसंचालक कपिल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर, प्रा. डॉ. जयदीप पाटील, प्रा. डॉ. एस आर चौधरी, साने गुरुजी वाचनालयाचे प्रकाश वाघ, वित्त लेखाधिकारी राजेंद्र खैरनार उपस्थित होते. सुरुवातीला मराठी लाईव्ह न्युज चे संपादक ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविक केले. यानंतर मान्यवरांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. मान्यवरांच्या हस्ते सामाजिक, राजकीय, पर्यावरण, उद्योग, अध्यात्म, विज्ञान, दिव्यांग, युवा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या दहा कर्तृत्ववान व्यक्तींचा शाल, पुष्पगुच्छ, स्मृतिचिन्ह, गौरवपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. वसुंधरा लांडगे यांनी केले.

श्री महाले पुढे म्हणाले की, मराठी लाईव्ह न्युज ने चार वर्षात वाचकांच्या मनावर नाव कोरले यामागे त्यांची मोठी मेहनत आहे. चांगल्या कामात सर्व लोक पाठीशी असतात. शिक्षकाकडे सुसंवाद, अध्यापनाची कला असते. अशा व्यक्ती मनापासून पत्रकारिता निभावतात. शिक्षकाने पत्रकारिता करणे हा पत्रकारितेचा सन्मान आहे. पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड करून पुरस्कार देण्यात खूप मोठे मन असावे लागते.

नागपूर महानगर विकास प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार म्हणाले की, पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. आपल्या परिसरातील सुयोग्य व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करुन मराठी लाईव्ह न्युज ने वेगळा ठसा उमटवला आहे. चार वर्षात चांगल्या पद्धतीने प्रगती करून माणसे जोडण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. पत्रकारिता हे एक प्रभावी माध्यम असून पत्रकारितेतून माणसे जोडण्याचे काम केले. साने गुरुजींच्या विचाराने कृतिशील भूमीत चांगले विचारांची पेरणी झाली आहे. हा कार्यक्रम अगदी ब्रिटिश काळात निर्माण झालेल्या साने गुरुजी वाचनालयात झाला. पत्रकारितेचे स्वरूप बदलत असलं तरी पत्रकारितेतली मूळ मूल्य कायम आहेत. माध्यम बदलले तरी ही मूल्य बदलणार नसून भविष्यात कायम राहील असेही ते म्हणाले.

डॉ. जयदीप पाटील म्हणाले की, पत्रकाराला समाजाची आई होता आले पाहिजे. पत्रकार जर शिक्षक असेल तर उत्तमच. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकार होते. ब्रिटिश काळात पत्रकारांचे योगदान मोठे होते. पत्रकारांच्या लेखणीमुळे चांगली चळवळ उभी राहिली. एखाद्या विषयाला अमृत करण्याची ताकद पत्रकारितेत असते. ब्रिटिशांनी विद्रोही पत्रकारांवर कारवाई केली. पत्रकाराचे शब्द महत्त्वाचे असतात. शब्दच करतात क्रांती आणि शब्दच जोडतात माणसे. समाजाचा ठाव घेणारे शब्दच असतात. काळानुरुप पत्रकारांनी बदल केला पाहिजे. डिजिटल युग आहे त्यामुळे अद्ययावत होणे गरजेचे आहे. ज्याला काळाची पावले होता येते त्याला जग जिंकता येते. पत्रकाराने चांगुलपणा जपला पाहिजे. जगण्यातील ऊर्जा व झपाटलेपण हरविता कामा नये. स्वतःच्या जीवनातील चैतन्य शोधले पाहिजे. चेहरा निर्माण करायला कर्तुत्व लागते असे सांगत त्यांनी आपले सुंदर विचार मांडले. कपिल पवार, सुनील नंदवाळकर, चौधरी सर, विलासराव पाटील यांचेसह पुरस्कारार्थी माजी मुख्याध्यापक सतीश देशमुख, विजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी आमदार शिरीषदादा चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमाताई पाटील यांनी आपली उपस्थिती दिली.

पुरस्कारासाठी विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. डॉ. जयदीप पाटील, आदर्श माता पिता पुरस्कार साने गुरुजी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एच. डी. देशमुख व सौ. अनिता देशमुख, अध्यात्मिक क्षेत्रातील कार्याबद्दल प्रा. आर. बी. पवार व ज्योती पवार, सामाजिक व राजकीय क्षेत्रात विक्रांत पाटील व स्वप्ना पाटील, पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र अमळनेर चे विजय पवार, दिव्यांगांच्या उत्कृष्ट कार्यासाठी डॉ. योगेश महाजन, पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पक्षीमित्र अश्विन पाटील, युवा प्रेरणा पुरस्कार गणेश भामरे, सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल भिकेश पावबा पाटील, युवा उद्योजक अक्षय साळी (मोंटी) यांचा समावेश होता. कार्यक्रमात व्हाईस अॉफ मीडियाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डिगंबर महाले, काँग्रेस शिक्षक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुख विलासराव पाटील, अर्बन बँकेच्या निवडणुकीत निवडून आल्याबद्दल सौ. वसुंधरा लांडगे, तसेच टॅक्सी चालक यांचा यांनी दोन्ही मुलांना डॉक्टर शिक्षण दिल्याबद्दल शाल बुके देऊन गौरविण्यात आले. यावेळी मराठी लाईव्ह न्युज चे ईश्वर महाजन यांच्यावर प्रेम करणारे विविध स्तरातील मान्यवर, पत्रकार बांधव, समाज बांधव आदी उपस्थित होते. अनेकांनी ईश्वर महाजन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक मंडळ, कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!