मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण; दोनही नेते संमेलनास उपस्थित राहणार

राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्याचे दिले आश्वासन

अमळनेर (साने गुरुजी साहित्य नगरी) : पूज्य साने गुरूजी यांचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष (१२५ वर्ष) आहे. त्यांची कर्मभूमी असलेल्या अमळनेरमध्ये ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे, याचा आनंद आहे. हे संमेलन खान्देशच्या साहित्यिक वैभवात भर घालणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, कार्याध्यक्षा प्रा.डॉ. उज्ज्वला मेहंदळे व संमेलनाचे समन्वयक प्रा.डॉ.नरेंद्र पाठक यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची नुकतीच भेट घेवून साहित्य संमेलनाचे निमंत्रण दिले. यावेळी झालेल्या चर्चेत ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संमेलनाच्या समारोपाला तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आश्वासन दिले. चर्चेदरम्यान दोन्ही नेत्यांनी संमेलनाच्या तयारीची सविस्तर माहिती घेत कामाबद्दल समाधान व्यक्त केले. संमेलनासाठी राज्य शासनातर्फे सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, साने गुरुजींच्या कर्मभूमीत मराठी साहित्य संमेलन होत आहे, ही केवळ खान्देशसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. या संमेलनात घेण्यात येणाऱ्या विषयांवरील मंथनामुळे राज्याला दिशा देखील मिळेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. संपूर्ण खान्देशला साहित्य क्षेत्राची मोठी परंपरा राहिली आहे. यामुळे हे संमेलन निश्चितपणे यशस्वी होईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ना.अजितदादा पवार म्हणाले की, आदरातिथ्याच्या बाबतीत जळगावचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते. यामुळे साने गुरुजींच्या कर्मभूमीत होत असलेले साहित्य संमेलन निश्चितच यशस्वी ठरेल. संमेलनाचे निमंत्रक तथा पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यासाठी विशेष मेहनत घेत असून त्यांच्या माध्यमातून साहित्य संमेलनाच्या तयारीची माहिती मी नियमितपणे घेत असल्याचेही नमूद केले. खान्देशला मोठी साहित्यिक परंपरा आहे. ही परंपरा ९७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अजून बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!