मुख्याधिकारी यांनी लेखी पत्र दिल्यावर आंदोलन मागे

अमळनेर : शहरातील नागरिकांना सुखसोयी देण्यापेक्षा करांच्या माध्यमातून अव्वाच्या सव्वा लूट होत असल्याने माजी आमदार शिरीष दादा चौधरी मित्र परिवाराने नुकतेच वाढीव घरपट्टी व पाणीपट्टी निर्णयाच्या विरोधात नगर परिषदेत ठिय्या आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन ते अडीच तास ठिय्या आंदोलन केल्याने अखेर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देत शासनाकडे मार्गदर्शन मागवण्याबाबत लेखी आश्वासन दिले.
शहरातील नागरिकांना नगरपरिषदेमार्फत घरपट्टी व पाणीपट्टी वसुली करिता देण्यात येणाऱ्या नळपट्टी बिलामध्ये रकमेस द. सा. द. शे. २ टक्के प्रमाणे व्याज लावण्याचा तूगलकी निर्णय घेत नागरिकांना बील दिले जात आहे. कायद्याचा धाक दाखवत सदर व्याज वसुलीचे धोरण म्हणजे आपण अमळनेर करांची एक प्रकारे लूट करीत आहात अशी भावना जन माणसाची झाली आहे. त्याचप्रमाणे शहरातील नागरिकांचा मालमत्ता धारकांना लोकवर्गणीच्या नावाखाली वारंवार वसुलीचा घाट घातला जात आहे. बांधकाम परवानगी वेळेस लोकवर्गणी, नळ कनेक्शन घेताना लोकवर्गणी, मालमत्ता वार्षिक करात लोकवर्गणी म्हणजे एकाच व्यक्तीकडून किती वेळेस लोक वर्गणी घ्यावी याला देखील मर्यादा आहेत की नाही ? त्याचप्रमाणे खुल्या भूखंडांना देखील नगर परिषदेने कर निश्चित केला आहे. आपण आम्हां नागरिकांना सुखसोयी देण्यापेक्षा करांच्या माध्यमातून एक प्रकारे अव्वाच्या सव्वा लूट करीत आहात. वरील तुगलकी निर्णय सावकारी निर्णय तत्काळ नागरी हितासाठीच मागे घ्यावा. यासाठी आज आमदार शिरीष दादा मित्रपरिवार आघाडी तर्फे जोपर्यंत लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत मुख्याधिकारी यांच्या दालनात आंदोलन करण्यात आले. सुमारे दोन ते अडीच तास ठिय्या आंदोलन केल्याने अखेर मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ देत शासनाकडे मार्गदर्शन मागवण्याबाबत लेखी आश्वासन दिले. गटनेते बबलीभाऊ पाठक, भाऊसाहेब महाजन, बाळासाहेब संदानशिव, पंकज चौधरी, दिपक चौगुले, अविनाश जाधव, नरेश कांबळे, मनोज शिंगाणे, संतोष पाटील, राहुल कंजर, अतुल चौधरी आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. “कोण म्हणतं देणार नाही.. घेतल्याशिवाय राहणार नाही, तुगलकी निर्णय तात्काळ मागे घेतलाच पाहिजे, शिरीष दादा चौधरी मित्रपरिवार आघाडीचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.