संमेलना चला… तुम्ही संमेलना चला
नवे वर्ष अमळनेरकरांच्या स्मरणात कायम राहील असे उपक्रम वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारी महिन्यात घेऊन येत आहे. ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे दिनांक २ फेब्रुवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ ला होत आहे. त्याची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. मराठी वाड्मय मंडळ या १९५१ यावर्षी स्थापन झालेल्या संस्थेने १९५२ ला ३५ व्या “महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे” आयोजन केले होते. त्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी पुनश्च अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेरला होत आहे. त्याचे आयोजन देखील मराठी वाड्मय मंडळानेच केले आहे.
यातल्या काही ठळक गोष्टी… सन १९५२ चे संमेलन हे अत्रे, फडके यांच्या “जीवनासाठी कला की कलेसाठी जीवन” या महाराष्ट्रात गाजलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर झाले परंतु संमेलनात कुठेही या वादाचा लवलेश दिसला नाही. फडके, अत्रे यांचे सह महाराष्ट्रातील त्याकाळचे गाजलेले साहित्यिक, लेखक यावेळी उपस्थित होते. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कृ.पां.कुलकर्णी हे ज्येष्ठ समीक्षक साहित्यिक होते. प्रताप महाविद्यालय प्रांगणात दिनांक १२, १३ आणि ऑक्टोबर १९५२ ला हे संमेलन झाले. हजारोच्या संख्येने लोक हजर होते. अमळनेरच्या सांस्कृतिक इतिहासात ही घटना मैलाचा दगड ठरली आहे. या संमेलन स्थळाला “साने गुरुजी नगरी” असे नाव दिले होते. आज पुन्हा प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणातच “पूज्य साने गुरुजी नगरी” नावानेच त्या जागेवर संमेलन होत आहे. १९५२ च्या संमेलनात प्रथमच स्थानिक ॲडव्होकेट मो. द. ब्रम्हे यांचे मराठी नाटक सादर झाले होते. नाटकातील स्त्री पात्रे ही स्त्रियांनीच केली होती. ही बाब त्या काळात विशेष धाडसाची होती. इतरही साहित्य विषयक कार्यक्रम गाजले. येत्या फेब्रुवारी २०२४ महिन्यात दिनांक २, ३ व ४ रोजी होणाऱ्या संमेलनात देखील भरगच्च साहित्य विषय कार्यक्रम आहेत त्याचा लाभ सगळ्यांना मिळणार आहे. या संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत विविध उपक्रमांपैकी ‘मराठी गझल कट्टा’ या लोकप्रिय कार्यक्रमाला पुरेसा वेळ आणि प्रतिनिधित्व मिळाले नाही म्हणून बरीच नाराजी दिसते. त्यातून झालेल्या वादविवादातून मराठी गझल साठी स्वतंत्र संमेलन व्हावे असा रसिकांचा सूर दिसला. त्याला मूर्त स्वरूप खानदेश साहित्य मंच या संस्थेने दिले आणि दिनांक २७ व २८ जानेवारी २०२४ रोजी अमळनेरच्या छत्रपती शिवाजी नाट्यगृह येथे महाराष्ट्रातील पहिले “एल्गार मराठी गझल संमेलन” संपन्न होत आहे ही देखील एक ऐतिहासिक घटना म्हणावी लागेल. मराठी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात गझल कट्ट्याच्या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो. त्यामुळे इतर कार्यक्रमांचे मंडप ओस पडतात ही वस्तुस्थिती आहे. या गझल कट्ट्यासाठी मराठी गजलेची पताका सर्वदूर डौलाने फडकवणाऱ्या कै.सुरेश भट यांच्या गझलेचे “एल्गार” हे नाव देऊन आयोजकांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. संपूर्ण गझल या विषयावर हे पहिलेच संमेलन होत आहे. अमळनेरच्या मातीतच पूज्य साने गुरुजी सारख्या विभूतीने वेळोवेळी अन्याय आणि दडपशाही याविरुद्ध लढा उभारला. त्याच मातीतून एल्गार गझल संमेलन सारखा उपक्रम आकाराला यावा हे यथोचितच आहे. हे संमेलन अभूतपूर्व यशस्वी होईल यात शंका नाही.
याच काळात दिनांक ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला “विद्रोही मराठी साहित्य संमेलन” होत आहे. गेल्या काही वर्षांपासून विद्रोही साहित्य संमेलनाने प्रबोधनाचा वसा घेऊन सर्वसामान्य, वंचित अशा घटकांच्या आशा, आकांक्षा व समस्यांना एक साहित्यिक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. दिवसेंदिवस त्याला व्यापक जनाधार लाभत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मनोरंजक विषय कार्यक्रमांची रेलचेल असते व ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडत नाही. असा एक आरोप होतो. त्या पार्श्वभूमीवर विद्रोही साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नांना साहित्याच्या माध्यमातून जगासमोर आणण्याचा प्रयत्न होतो हे नाकारता येत नाही.
या तीनही संमेलनातून अमळनेर नगरीत साहित्य विषयक वैचारिक घुसळन व्हावी. त्यातून निखळ आनंदाचे “नवनीत” श्रोत्यांच्या, प्रेक्षकांच्या आणि रसिकांच्या हाती यावे, त्यांनी तृप्त व्हावे, अशी अपेक्षा करु या. यासाठी आपणच सर्वांनी या संमेलनाचे आयोजकांना यथाशक्ती मदत आणि सहकार्य करु या.