मराठी साहित्य संमेलनात महाविद्यालयीन तरुणाईचा सहभाग वाढविण्यासाठी ना. अनिल पाटील यांनी घातली तरुणाईला साद

अमळनेर (साने गुरुजी साहित्य नगरी) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सर्वसामान्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी संमेलनाचे निमंत्रक तथा राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी चक्क महाविद्यालयात जावून युवक-युवतींशी संवाद साधला. तरुणाईला साहित्य संमेलनात माहिती व ज्ञानाचा खजिना मिळेल. जो भविष्यात त्यांच्या कामी येईल, अशा शब्दात त्यांनी तरुणाईला साद घातली.

मंत्री नामदार अनिल पाटील यांनी प्रताप महाविद्यालयात आढावा बैठक घेऊन शासकीय अधिकारी व म. वा. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत संपूर्ण संमेलन स्थळाची पाहणी केली. संमेलनाच्या तयारी संदर्भात माहिती जाणून घेतली. मदतीसाठी सेवेकरी, पोलीस बंदोबस्त, सुरक्षा रक्षक नेमणूक याबाबत सविस्तर चर्चा केली व काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या. मराठी साहित्य संमेलनासाठी केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत संमेलनाच्या तयारीसाठी मायक्रो प्लॅनिंग करा, कोणतीही उणीव राहू देऊ नका, जबाबदारीचे विकेंद्रीकरण करा आदी सूचना नामदार अनिल पाटील यांनी दिल्या. काही बदल देखील त्यांनी सुचविले. पाहणी दरम्यान मंत्री पाटील यांनी महाविद्यालयीन युवक व युवतींशी संवाद साधत त्यांच्यात संमेलनाबाबत उत्सुकता वाढवली.

बैठकीत प्रांताधिकारी तथा संमेलनाचे समन्वयक महादेव खेडकर, डीवायएसपी सुनिल नंदवाळकर, तहसीलदार सुराणा, पोलीस निरीक्षक विजय शिंदे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, म. वा. मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी, खा.शि. मंडळाचे संचालक नीरज अग्रवाल, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील व इतर शाखा अभियंता, म. वा. मंडळाचे शरद सोनवणे, संदीप घोरपडे, नरेंद्र निकुंभ, श्यामकांत भदाणे, बन्सीलाल भागवत, वसुंधरा लांडगे, प्रा. शिला पाटील, स्नेहा एकतारे, प्राचार्य डॉ ए. बी. जैन आदी उपस्थित होते.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!