शायर आणि कवींचा आवाज आवश्यक, त्याशिवाय व्यवस्थेला जाग येत नाही : रंगकर्मी शंभु आण्णा पाटील

अमळनेर : संधी कोणाला मिळते आणि त्या संधीचा उपयोग कोणी कसा घ्यायचा असतो ? हे वेळ, काळ आणि त्याच्या नशिबावर, प्रयत्नांवर अवलंबून असते असे मत कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष तथा मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल भाईदास पाटील यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सुरु असलेल्या दोन दिवसांचे एल्गार गझल संमेलन उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी एल्गार मराठी गजल संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ गझलकार शिवाजीराव जवरे, उद्घाटक ज्येष्ठ रंगकर्मी शंभु पाटील, निमंत्रक सदाशिव सूर्यवंशी, अहिराणी साहित्यिक कृष्णा पाटील, नाना लोढम, दगडूदादा लोमटे, रमेश बोरसे, शरद पाटील यांचेसह मराठा समाज अध्यक्ष जयवंतराव पाटील, प्रा. अशोक पवार, दिलीप सोनवणे, महेंद्र बोरसे, अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, रोटरी क्लबचे प्रतिक जैन, खान्देश साहित्य संघाचे जिल्हाध्यक्ष कुणाल पवार आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते पुज्य सानेगुरुजी, बहिणाबाई चौधरी व गझलकार सुरेश भट यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. आयोजकांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.
प्रास्ताविक करताना सदाशिव सूर्यवंशी यांनी मराठी गझल संमेलनाचा उद्देश सांगितला. गझलकार स्व. सुरेश भट यांच्या स्मृतींना उजाळा दिला. प्राचीन संस्कृती जोपासण्यासाठी व जगण्याचे प्रश्न बाजूला ठेवून गझलकार हा नेहमी व्यवस्थेच्या बाजूने असतो असेही त्यांनी सांगितले. यावेळी वृषाली मरतोळे, शरद पाटील उद्योगपती, योगेश उगले नाशिक यांना मान्यवरांच्या हस्ते ‘गजलांकूर पुरस्कार २०२४’ देऊन गौरविण्यात आले.
महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार अनिल पाटील म्हणाले की, मी स्वतःला भाग्यवान समजतो कारण माझ्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात एकाचवेळी तीन संमेलने होत आहेत. पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मान मिळाला. इतिहास घडविण्यात महाराष्ट्राचा सर्वाधिक सिंहाचा वाटा आहे. इतिहासकारांच्या माध्यमातून, साहित्यिकांच्या माध्यमातून, कवींच्या माध्यमातून इतिहास लिहिला असेल पण आपण एलगार पुकारून हा गझल कार्यक्रम या ठिकाणी अधोरेखित करुन नवीन इतिहास घडविला. ती जबाबदारी आपण पार पाडण्याचा प्रयत्न करत आहात. माझा इतिहास राजकीय असला तरीसुद्धा तुमच्या पावलावर पाऊल टाकण्याचं काम सातत्याने करतोय आणि त्या तून भविष्यामध्ये इतिहास घडताना आपल्याला प्रामुख्याने दिसतोय. या संमेलनाचा उद्देश काय, संधी आणि समानते बाबत माझ्या आयुष्यात मी कदाचित पहिल्यांदाच ते ऐकलं असेल कारण कागदावरतीच मी फक्त बघतो पण संधी कोणाला मिळते आणि त्या संधीचा उपयोग कोणी कसा घ्यायचा असतो हे वेळ आणि काळ त्याच्या नशिबावर, त्याच्या प्रयत्नांवर अवलंबून असते. खानदेशच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाला तर आमच्याकडे इतिहासामध्ये पहिल्यांदा असा प्रसंग आम्हाला बघायला मिळतोय. मला विधानसभेमध्ये जायची संधी २०१९ ला पहिल्यांदा मिळाली. संधी प्राप्त झाल्यानंतर या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या कामांना देखील आमच्या राजकीय भाषेमध्ये सुरुवात झाली कदाचित पायगुणाचा हा प्रकार असू शकतो. ७५ वर्षाच्या इतिहासामध्ये या तालुक्याचा पहिल्यांदा मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळणे असेल, आमच्या २०-२२ वर्षापासून रखडलेला तापी प्रकल्प ज्याला ५००० कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे असेल तो सुद्धा आमच्या दृष्टीने झटका होता. त्याबरोबरच साहित्य संमेलनाची या ठिकाणी घोषणा होऊन त्या साहित्य संमेलना बरोबर आपल्या संमेलनाचा या ठिकाणी पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित करणे असे अनेक गोष्टी असतील त्या अनेक गोष्टींमध्ये आमच्यासारखे त्यामुळे भारावून गेलेलो आहोत. काय करायचं ते आम्हाला देखील समजत नाही. शेतीवर अवलंबून असलेल्या तालुक्यात आज अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचा कार्यक्रम पार पडतोय हीदेखील आमच्या दृष्टीने फार अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येकाला अभिमान असतोच. कोणाला धर्माचा, कुणाला जातीचा, साहित्यिकांना साहित्यिकांचा, राजकीय लोकांमध्ये एक दुसऱ्या विषयी त्यांना अभिमान असतोच. बोलीभाषेचा अभिमान ठेवला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करावा, मी सोबत असेल. येणाऱ्या काळात मराठी गझल संमेलनासाठी लागणारा पाठपुरावा मी नक्की शासन दरबारी करेन असे आश्वासित केले. यानंतर अध्यक्षीय भाषणाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटक शंभू आण्णा म्हणाले की, शायर आणि कवींचा आवाज आवश्यक असतो. त्याशिवाय व्यवस्थेला जाग येत नाही. सध्याच्या काळात इथं नुसती गझल होत नाही तर त्याचा एल्गार होतो आहे. या एल्गार मराठी गझल संमेलनाचे उद्घाटन करताना माझ्या मनात खूप आनंद आहे. एकाच गावात साहित्य संमेलन होते त्याच गावात विद्रोही संमेलन हे नियमित होतं. पण त्याच गावात गझल संमेलन होत आहे ही वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी बाब आहे. यासाठी खानदेश साहित्य संघाने टाकलेलं पाऊल अभिनंदनीय आहे. भारतीय संस्कृती कवींवर उभी आहे. अभिजात मराठी ची मागणी आहे. सगळ्यात सुंदर धर्माची व्याख्या सांगणारा माणूस याच मातीत जन्माला व खरा तो एकचि धर्म… सांगून गेला. कुठलीही भाषा ही भाषाच असते.. ती वाईट नसते. संत कबीर.. संत तुकाराम.. गालिब यांचे नाव घेत भाषेचं महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय पाटील व धुळे आकाशवाणी निवेदिका सौ.पूनम बेडसे यांनी केले. खान्देश साहित्य संघाच्या तालुकाध्यक्षा सुनिता पाटील यांनी आभार मानले.