
अमळनेर : अमळनेर शहरातील तथा सध्या पुणे येथे वास्तव्य असलेले मयुर बाळकृष्ण बागुल लिखित ‘सर्जक’ लेखसंग्रह हे पुस्तक शुक्रवार, दिनांक २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित करण्यात येणार आहे. पुणे शहरातील चपराक प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते, आंतरभारती चे कार्याध्यक्ष तथा जेष्ठ साहित्यिक अमर हबीब, पत्रकार बाळकृष्ण बागुल, समाजसेविका सौ. प्रभावती बा. बागुल यांचे हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. यावेळी साहित्य क्षेत्रातील पत्रकार जे.डी.पराडकर, शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे, चपराक प्रकाशन चे घनःश्याम पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
मयुर बागुल हे साप्ताहिक उदयकाळ चे संपादक बाळकृष्ण बागुल यांचे चिरंजीव आहेत. समाजातील विविध सामाजिक विषयावर ते लेखन करीत असतात. दैनिक अॅग्रोवन अंकातही ते लिखाण करतात. आजवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन मयूर बागुल यांनी केले आहे.