अमळनेर : येथे लवकरच एकाच वेळी दोन साहित्य संमेलने पार पाडली जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक २८ जानेवारी या दिवशी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या बाल मंच व युवा मंच साठी धनदाई एज्युकेशन सोसायटीच्या यशवंत हाॅल मध्ये प्रात्यक्षिके घेण्यात आली. यावेळी अनेक बालके, युवक युवती उपस्थित होत्या. विद्रोह म्हटला की, त्यात गरीब, वंचित, शेतकरी व्यवस्थेचा बळी अशा बहुजनांच्या वेदनेला गवसलेला आवाज असतो. समाजातील अन्यायकारी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवण्याची ताकद या घटकात असते. अशा घटकाचा आवाज असतो विद्रोह ! संघर्षाची फलश्रुती असते विद्रोह! अनेक महापुरुषांची ढाल असतो विद्रोह ! नीडराची उंच मान असतो विद्रोह ! विषमतेवर जालीम उपाय असतो विद्रोह ! बहुजनाचा आवाज असतो विद्रोह ! अशा विद्रोहासाठी १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे. या पार्श्वभूमीवर बालमंच व युवामंच समितीकडून विविध स्पर्धांसाठी बालके व युवक युवतींचे प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यामध्ये काव्यवाचन, वक्तृत्व, एकपात्री प्रयोग, नाटिका, पथनाट्य, समूहगीत, वेशभूषा याचे तज्ञांकडून परीक्षण करून निवड करण्यात आली.
या कार्यशाळेसाठी समिती प्रमुख एस. एच .भवरे यांनी विविध साहित्याची जाण असलेले प्रा. जितेंद्र माळी, प्रा. सुनील वाघमारे, प्रा. दिलीप कदम, प्रा. सतीश पारधी, बाल मंच व युवा मंच समन्वयक आर .जी .राठोड, एम. आर. तडवी, चंद्रकांत देसले, प्रेमराज पवार, गौतम मोरे अशा परीक्षकाकडून विविध स्पर्धांची चाचपणी करण्यात आली. सर्वप्रथम बहुतेक घटकात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याबाबत वेगवेगळ्या तज्ञांनी साहित्याच्या व कलागुणांच्या प्रकारांची माहिती व सादरीकरण कसे करावे ? याबाबत मार्गदर्शन केले. आलेल्या तज्ञांचे स्वागत समिती प्रमुख व समन्वयक यांनी केले. कार्यक्रमासाठी गट पाडण्यात आले. त्यानुसार वेगवेगळ्या स्पर्धांचे काटेकोरपणे मूल्यमापन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध विषयावर स्पर्धकांनी कार्यक्रम वेळेत सादर केले. त्यातून योग्य स्पर्धकाची निवड होऊ घातलेल्या १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात त्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळेल. विषमतेच्या मुळा उधळून काढणारे हे संमेलन मानव मुक्तीचे खरे संमेलन आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत देसले सर यांनी तर आभार प्रदर्शन मेधा पाटील यांनी केले.