दहा दिवसात जळगाव जिल्ह्यासाठी पाच पशु रुग्णवाहिका सुरु करुन त्यासाठी चालक व पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होणार !
जळगाव : शासनाने जनावरांच्या मोफत आरोग्य सेवेसाठी सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात ८० अद्ययावत पशु रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र त्यासाठी लागणारी औषधी, पशुवैद्यकीय अधिकारी, वाहन चालक उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका वापराविना पडून आहेत. याशिवाय अन्य मागण्यांबाबत जिल्ह्यातील गोसेवा संघ चालकांच्या सुमारे ५८ सदस्यांनी सोमवार, दिनांक २९ जानेवारी रोजी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालय, पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यावर पशुसंवर्धन उपायुक्त शांताराम पाटील यांनी पुण्याचे पशुसंवर्धन आयुक्त देवेंद्र यादव यांनी दखल घेतल्याचे सांगून येत्या दहा दिवसात जळगाव जिल्ह्यासाठी पाच पशु रुग्णवाहिका सुरु करुन त्यासाठी चालक व पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन दिले जातील असे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील गोशाळांमध्ये जनावरांचे गायींचे लसीकरण, औषधे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही सांगितले. पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन बोगस गो सेवकांवर कारवाई करण्यात यावी व पशुधनाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पोलिसांचे सहकार्य मिळत नाही अशी तक्रार केली त्यावेळी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दखल घेतली जाईल असे सांगितले. राजकुमार छाजेड यांचे सह जळगाव जिल्ह्यातील प्रविण पाटील, दिपक पाटील, रमेश बाफना, विनायक सोनवणे, डॉ. बन्सीलाल दुगड, राजेंद्र कोळी, प्रताप सोनवणे, विशाल देवरे, शेखर कानडे, पंडित संदीप महाराज, गोकुळ कोळी, दिनेश सोनार आदी ५८ गोशाळा चालक मोर्चात सहभागी झाले होते.
जय जिनेन्द्र फौंडेशनचे राजकुमार छाजेड यांनी अमळनेर येथे मोर्चा पूर्वी पत्रकार परिषद घेऊन याबाबतचे सर्व मुद्दे जाहीर केले होते. त्यावेळी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणार असल्याचेही जाहीर केले होते. मुद्दे असे…
शासनाकडून जनावरांच्या मोफत आरोग्य सेवेसाठी महाराष्ट्रात सहा महिन्यांपूर्वी ८० पशु रुग्णवाहिका देण्यात आल्या असून त्यासाठी लागणारी औषधी, पशुवैद्यकीय अधिकारी, वाहन चालक उपलब्ध नसल्याने रुग्णवाहिका वापराविना पडून आहेत. पशु रुग्णवाहिका नसल्याने गो शाळेच्या गायींना व मोकाट जनावरांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यासाठी १९६२ हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. मात्र या क्रमांकावर फोन लावल्यास तुम्हाला काय आरोग्य सुविधा हवी आहे ? पशुवैद्यकीय अधिकारी किंवा संबंधित अधिकारी पाठवतो असे सांगितले जाते. यामुळे मोकाट गायींवर उपचार करता येत नाही. अनेक गायींचा मृत्यू होतो. नगरपालिका जनतेकडून मोकाट गुरांचा कर घेते मात्र प्रत्यक्षात कोंडवाडे नाहीत. भटक्या गाईंना इंजेक्शन देऊन कत्तलखान्यात पाठवले जाते. अशा भटक्या गायी जमा करुन रीतसर गोशाळेकडे दिल्यास गोशाळा ती जबाबदारी घेईल. त्यामुळे पर्यावरण पूरक हो गोकाष्ठ बनवण्यास मदत होईल. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यात गायींना चाऱ्यासाठी अनुदान दिले जाते. त्यात धर्तीवर महाराष्ट्रात देखील अनुदान देण्यात यावे.
भारत सरकारच्या ग्रीन क्रेडिट प्रोग्राम अंमलबजावणी २०२३ अंतर्गत कार्बन क्रेडिट संकल्पना राबविण्याबाबत व राज्यात दरवर्षी होणाऱ्या वीस लाख वृक्षांच्या कार्बनडाय-ऑक्साइडच्या प्रदूषणाची तीव्रता दहा टक्क्यावर आणण्यासाठी अंतिम संस्कार साठी गोकाष्ठ चा वापर करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. या पत्रास अनुसरून जिल्हाधिकारी कार्यालय नगर विकास शाखेचे सह आयुक्त जनार्दन पवार यांनी जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त व सर्व नगरपरिषद /नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांना पत्र देऊन नगरपरिषद /महानगरपालिका हद्दीतील स्मशानभूमीच्या आवारात जय जिनेन्द्र फौंडेशनच्या वैकुंठवारी प्रकल्प गोकाष्ठ चे स्टॉल उभारण्यात यावे व तशा आशयाचे बोर्ड लावण्यात यावे. बोर्ड लावण्यासाठी उचित कार्यवाही करावी असे पत्राद्वारे कळविले आहे.
शालेय पोषण आहारात अंडी का ?
शास्त्रीय अहवालानुसार अंडी लहान बालकांना घातक आहेत. अंडी मुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाणात वाढ होते. असे असूनही शालेय पोषण आहार योजनेंतर्गत बालकांना अंडी का दिली जातात ? पोल्ट्री हा धनदांडग्यांचा व्यवसाय आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली पपई, केळी सारखी पोषक फळे दिल्यास फायदेशीर ठरेल. शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल याबाबत विचार होणे आवश्यक आहे असे ही राजकुमार छाजेड यांनी सांगितले.