दुसरे अ. भा. मराठी गझल संमेलन आंबेजोगाई येथे होणार

अमळनेर : गझल हे समाज जीवनावर संस्कृतीवर आणि वास्तववादी जीवनावर प्रकाश टाकण्याचे साधन आहे. अखिल भारतीय गझल संमेलन भरणे म्हणजे गझल व्यापक झाली असल्याचा उत्तम काळ आहे असे मत पहिले अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलनाचे अध्यक्ष शिवाजीराव जवरे यांनी समारोप प्रसंगी केले. यावेळी दुसरे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन आंबेजोगाई येथे घेण्यात येईल असेही जाहीर करण्यात आले. खान्देश साहित्य संघाचे वतीने अमळनेर येथे दिनांक २७ व २८ जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात गझल संमेलन आयोजित करण्यात आले होते.
खान्देश साहित्य संघाचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी म्हणाले की, साने गुरुजींच्या भूमीत व्यवहारातून अथवा वादातून नव्हे तर संवादातून गझल संमेलन झाले. अखिल भारतीय मराठी संमेलनाला पर्याय म्हणून आमची भूमिका नव्हती असेही स्पष्ट केले. श्री दगडू लोमटे म्हणाले की, खान्देश साहित्य संघाने अखिल भारतीय गझल संमेलनाची मशाल पेटवली आहे ही मशाल अशीच पेटती राहिली पाहिजे गझलेला स्वतंत्र अस्तित्व पाहिजे होते म्हणून हे संमेलन भरविण्यात आले.
दोन दिवशीय गझल संमेलनात एकूण १८ स्मृती मुशायरे झाले. यात, स्व. कमलाकर आबा देसले, म.बदीउज्जमा खावर, स्व. मनोहर रणपिसे, स्व. अरुणोदय भाटकर, म. इलाही जमादार, स्व. अनिल कांबळे, स्व. मधुसूदन नानिवडेकर, स्व. प्रकाश मोरे, दुसऱ्या दिवशी स्व. व्यंकट देशमुख, स्व. विनिता कुलकर्णी पाटील, स्व. नाना बेरगुडे, स्व. सुप्रिया जाधव, स्व. उ.रा.गिरी, स्व. लक्ष्मण जेवणे रवींद्र ठाकूर, स्व. गिरीश खारकर, म.कलीम खान, स्व. गौरवकुमार आठवले असे स्मृती मुशायरा झाले. महाराष्ट्र नव्हे तर बाहेरील राज्यांतूनही गझलकारांनी आपल्या गझलांचे सादरीकरण केले. गझलकरांनी शेती व्यवस्था, समस्या, सरकारचे धोरण, प्रेम, कुटुंब, शिक्षण, महागाई, राजकीय स्थिती यावर मुख्य प्रकाश टाकला. संमेलनाच्या पहिल्या दिवशी समारोप करताना ‘हे जगण्याचे भाषांतर.. काळजाचा काळाशी थेट संवाद’ गझल मैफिल रंगली. यात, गोपाल मापारी (बुलढाणा) यांनी सूत्रसंचालन केले. राहुलदेव कदम लातूर व संकेत नागपुरकर (नागपूर) यांनी अप्रतिम असे गजल गायन केले सहभागी वादकांमध्ये तबलावादक : योगेश संदानशिव (अमळनेर), हार्मोनियम : जितेश मराठे (जळगाव), गिटार : स्वराज भोसले (पुणे), बासरी : आईनोद्दिन वारसी (देगलूर) यांचा सहभाग होता. यानंतर सर्वात शेवटी समारोपावेळी ठराव वाचन व आभार व्यक्त करण्यात आले. शिवाजी जवरे, नितीन देशमुख, शिव डोईजोडे, दगडू लोमटे, शरद धनगर, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, डॉ. कुणाल पवार महेंद्र बोरसे, रमेश बोरसे, रत्ना पाटील, सुनिता पाटील, संजय पाटील आदींनी खालील ठराव मांडले ते एकमताने मंजूर करण्यात आले.
- गझल व बोलीभाषा साहित्याचा प्राथमिक स्तरापासून उच्च शिक्षणापर्यंत अभ्यासक्रमात समावेश करावा.
- अहिराणी भाषेला प्रमाण भाषेचा दर्जा मिळावा आणि संविधानातील आठव्या सूचित समावेश करावा.
- खानदेशातील पुरुषी व जलसिंचन व इतर क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळ निर्माण करून विविध प्रकल्प निर्मिले जावेत.
- गझल कार्यशाळा संवर्धनासाठी संमेलनासाठी साहित्य मंडळांनी व भाषा मंत्रालयाने आर्थिक तरतूद करावी.
- खानदेशी बोलीभाषा साहित्य व संस्कृती संवर्धन तथा वृद्धीसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र व संग्रहालय खानदेशात उभारावे.
- खान्देशातील पाडळसरे धरणाचा केंद्राच्या योजनेत समावेश करावा आणि गतीने प्रकल्प पूर्ण करावा.
- अखिल भारतीय गझल संमेलन व गझल संवर्धन समृद्धीसाठी शासन दरबारी भूमिका मांडण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचे अभिनंदन.
गझल संमेलन यशस्वीतेसाठी स्थानिक व्यवस्थापन समितीचे सौ. सुनीता रत्नाकर पाटील, शरद भिका पाटील दत्तात्रय बारकू सोनवणे, रामकृष्ण सर्जेराव बाविस्कर, ज्ञानेश्वर आधार धनगर, रत्नाकर संभाजीराव पाटील, मनोहर एकनाथ नेरकर, उमेश प्रतापराव काटे, गोपाल पा. हडपे, सौ. छाया अशोक ईसे, श्रीमती जयश्री दिलीप पवार, सौ. प्रतिभा रामचंद्र पाटील, सौ. नूतन हिम्मतराव पाटील, सौ. पुनम भाईदास शिंदे, सौ. रेखा वाल्मिक मराठे, सौ. रजनीताई पाटील, वाल्मिक रोहिदास मराठे, अशोक शांताराम इसे, चंद्रकांत भिला पाटील निरंजन रमेश पेंढारे, रामेश्वर तुकाराम भदाणे, श्रीमती क्रांती किसनराव पाटील, श्रीमती पाकीजा बाबूलाल पिंजारी, श्रीमती अनिता दीपक बोरसे, विजय आनंदा पाटील आदींनी परिश्रम घेतले.