
अमळनेर येथे पुज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत ७२ वर्षांनंतर दिनांक २ ते ४ फेब्रुवारी २०२४ रोजी ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले, ही अभिमानाची बाब म्हणावी लागेल. तर याच काळात दुसरीकडे ३ व ४ फेब्रुवारी २०२४ ला १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनपूर्व कलानंद बाल मेळावा सह सर्वच कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या पहिल्या दिवशी सकाळी इतर कार्यक्रम नसल्याने भव्य अशी ग्रंथदिंडी होती. ग्रंथदिंडीत राज्यातील मंत्री, राजकीय नेते, शालेय विद्यार्थी, शिक्षकांची मोठी गर्दी होती.. उद्घाटनानंतर मात्र समारोप होईपर्यंत संमेलनस्थळी विचार ऐकायला फारशी गर्दी नव्हती. ८० टक्के खुर्च्या रिकाम्याच दिसत होत्या. मंडप, सभागृह, विचार दालने छान सजविली होती. नियोजनाचा मात्र फज्जा उडाला होता. समन्वयाचा अभाव जाणवला. पत्रकार बांधवांना ओळख पत्रासाठी वणवण करावी लागली. रस्त्यावर राजकीय नेत्यांच्या स्वागताचे बॅनर झळकले पण संमेलनस्थळी व रस्त्यांवर दिशादर्शक फलक नव्हते. पहिल्याच दिवशी ग्रंथदिंडीतील अनेक शालेय विद्यार्थ्यांना जेवण मिळाले नाही तर काहींना दुसऱ्याच ठिकाणी जेवणाची सोय केली. मुख्य सभागृहापासून ग्रंथ प्रदर्शनाचे दालन दूर असणे चुकीचेच ठरले. एकाच ठिकाणी व्यवस्था नसल्याने कुठे काय व्यवस्था तेच कळत नव्हते. ग्रंथ प्रदर्शनाचे अनेक स्टॉल रिकामेच दिसून आले. यात संमेलनाध्यक्षांचा काय दोष ? खुर्चीत बसून राहण्याशिवाय पर्याय नव्हता, तो आयोजकांचा दोष होता. शासनाचा नव्हे तर जनतेचा पैसा उधळला गेला हे मात्र खरे.
१८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या भव्य विचार दिंडीत शालेय विद्यार्थ्यांसोबत, महिला- पुरुषां चा उत्स्फूर्तपणे लक्षणीय सहभाग होता. उद्घाटनापासून समारोप होईपर्यंत संमेलनस्थळी विचार ऐकायला गर्दी होती. सर्वच सामाजिक, सांस्कृतिक विषय घेऊन सुंदर सादरीकरण झाले. ग्रंथ दालनात स्टॉल मोजकेच होते पण त्यात असलेली पुस्तके दिशा देणारी होती. विशेष म्हणजे शासनाच्या पैशाची मस्ती नव्हती. काहीसा अपवाद वगळता नियोजनबद्ध पद्धतीने जातीय सलोखा राखत संमेलन पार पडले. संमेलनात जनतेच्या विविध प्रश्नांवर अनेक ठराव करुन एक आदर्श घालून दिला. विद्रोही साहित्य संमेलनाचे हे यश असले तरी पुढे किती काळ टिकून राहील हा प्रश्न अनुत्तरित राहतो.
साहित्य क्षेत्रात रविंद्र शोभणेंचा साजेसा निर्णय…
९७ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे हे कोणत्याही मानपानाशिवाय संमेलनाध्यक्ष पदाच्या खुर्चीत बसून राहण्यापेक्षा मिळेल तसा वेळ काढून १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन स्थळी भेट देण्यासाठी आले. हा निश्चितच साहित्य क्षेत्रात साजेसा निर्णय घेतला असेच म्हणावे लागेल. असे असतांना विषमता दूर करणाऱ्या काही विद्रोही कार्यकर्त्यांनी रविंद्र शोभणेंना आत येण्यास मज्जाव करुन काय साधले ? या प्रकाराने राज्यभर साहित्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली. एक साहित्य रसिक म्हणून कोणी कोणत्या खुल्या कार्यक्रमास उपस्थित राहावे हे ठरविण्याचा माणूस म्हणून शोभणेंना नैतिक अधिकार आहेच. खरा साहित्यिक तोच असतो जो इतर साहित्यिक, विचारवंत व साहित्य स्थळाचा सन्मान करतो. आपल्या वैचारिक पातळीला महत्व देतो. अ. भा. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रविंद्र शोभणे यांनी तेच केले. विद्रोही च्या कार्यकर्त्यांनी उशिरा का होईना विषमता दूर करत संधीचं सोनं केलं. रविंद्र शोभणेंना पेढा भरवून तोंड गोड केले. हा इतिहास साहित्यात लिहिला जाईल.
एकंदरीत स्वतःला मोठे म्हणवून घेणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांची हार झाली. ‘गर्वाचे घर खाली..’ अशीच काहीशी स्थिती झाली. कार्यक्रमात सर्वच मनासारखं घडत नसतं पण यातून शिकवण घ्यायला हवी. एकंदरीत प्रतिसाद पाहता अमळनेर शहरातील जातीय विषमता वाढत चालल्याचे लक्षात येते. एकाचवेळी झालेल्या दोन संमेलनांमध्ये रसिकांना ईच्छा असूनही पुरेपूर सांस्कृतिक, वैचारिक आनंद घेता आला नाही हेही तितकेच खरे. साहजिकच राजकीय वातावरण आणि एकमेकांचे हेवेदावे यात साहित्य रसिकांची वैचारिक भूक अपूर्णच राहिली.