संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘जाऊ देवाचिया गावा’ या महानाट्याने रसिकांनी केले ‌‘जय हरी विठ्ठल’ नामस्मरण

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी गर्दी

अमळनेर (पूज्य साने गुरुजी साहित्य नगरी) : ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी सायंकाळी सादर झालेल्या संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारीत ‘जाऊ देवाचिया गावा’ या महानाट्याने रसिकांनी ‌‘जय हरी विठ्ठल’ नामस्मरण केले. खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी मुख्य सभामंडपात हे महानाट्य पाहण्यासाठी रसिकांची गर्दी होती. या नाटकाचे थेट प्रसारण ‌‘९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, अमळनेर’ या यू ट्यूब चॅनलवरून दाखविण्यात आल्याने काही नागरिकांनी घरी बसून महानाट्याचा लाभ घेतला.

या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन संजय भोसले यांनी केले असून त्यांनी संत तुकारामाची भूमिकाही साकारली आहे. अशोक पत्की यांनी संगीत दिलेले आहे. या महानाट्यात १५० कलावंतांनी सहभाग घेतला आहे. ७० कलावंतांनी आपल्या नृत्य कौंशल्यातून डोळ्याचे पारणे फेडले आहे. या महानाट्याची निमिर्ती डॉ.जर्नादन चितोडे अध्यक्ष वृंदावन चॅरीटेबल ट्रस्ट, पुणे यांनी केली आहे. बैलगाड्या, पालख्या, घोडे यांच्या सहभागाने या महानाट्यात जिवंतपणा आणला होता. यात १२ गाणी दाखविण्यात आली आहेत. मयूर वैद्य यांनी कोरीओग्राफी केली आहे. तर सतीश काळे यांनी गीते लिहीली आहेत. सुरेश वाडकर, आनंद भाटे, देवकी पंडित, रवींद्र साठे यांनी गाणी गायिली आहेत. आगळ्या वेगळ्या पध्दतीने सादर करण्यात आलेले व त्यागराज खाडीलकरांनी गायलेले म्मबाजी हे गीत दाद घेऊन गेले. संत तुकाराम यांचा सदेह वैकुठागमनाने महानाट्याचा समारोप करण्यात आला आहे. या प्रसंगाने अनेकांच्या डोळ्यात पाणी तराळले. यासाठी खान्देश शिक्षण मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या जीवनावर आधारित महानाट्याचा प्रयोग अमळनेरच्या खान्देश शिक्षण मंडळाचे बजरंग अग्रवाल यांनी पुणे येथे पाहिला होता. या महानाट्याने बजरंग अग्रवाल यांच्या मनावर चांगलेच गारूड केले आणि त्यांनी ठरविले की, या महानाट्याचा एक प्रयोग आपल्या अमळनेकरांसाठी करावा. योगायोगाने ९७ वे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजन प्रताप महाविद्यालयात होत असल्याने त्यात हे नाटक सादर करण्याचे त्यांनी निश्चित केले आणि समारोपीय दिवशी ते सादर करण्यात आले.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!