अनुपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्या रिकाम्या खुर्च्यांना पुष्पहार; समस्यांचा पाढा वाचत पार पडली वार्ड सभा

अमळनेर : तालुक्यातील झाडी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांचे वार्ड क्रमांक २ यांच्याशी सापत्न वागणूक देत आहेत. वार्ड क्रमांक २ मधील सदस्य निंबा लोटन पाटील व कलाबाई वसंतराव पाटील यांनी त्यांच्या वार्डातील समस्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यापर्यंत सांगून त्या समस्या सोडविण्यासाठी पूर्वसूचना देऊन सरपंच डॉ भुपेंद्र पाटील व ग्रामसेवक सुकलाल मालचे यांना आमंत्रित केले होते. परंतु त्यांनी लोकांच्या समस्यांबद्दल असंवेदनशीलता दाखवत सतत तीन वर्षांपासून पक्षपाती व दुजाभावाची भूमिका घेतली आहे. शिवाय वार्डसभेला आमंत्रित करुनही दांडी मारली. त्यामुळे अनुपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्या रिकाम्या खुर्च्यांना पुष्पहार घालून समस्यांचा पाढा वाचत वार्ड सभा पार पडली. यावेळी नागरिकांनी समस्या मांडल्या. यात, वार्ड मधील तलावाकडील गल्लीला काँक्रिटीकरण रस्ता करण्यात यावा, लोकांना तलावाकडे मुतारी उपलब्ध करून द्यावी, आहेत त्या मुताऱ्या व शौचालयांमध्ये प्रचंड अस्वच्छता असून रोगराईला आमंत्रण देत आहे, दिवाबत्तीची सोय नाही, नियमित पाणीपुरवठा होत नाही अशा अनेक समस्यांचा पाढा वार्ड क्रमांक २ मधील संतप्त नागरिकांनी वाचून दाखवला. झोपेचे सोंग घेणाऱ्यांना आता तरी जाग यावी अशी अपेक्षा उपस्थित रहिवाशांनी व्यक्त केली आहे.