प्रणव पाटील या विद्यार्थ्याने साकारली संत तुकारामांची भूमिका, ख़ास भूमिका करणाऱ्यांचा सन्मान
अमळनेर : एखाद्या विषयाची प्रत्यक्ष अध्ययन अनुभूती कशी करता येईल, यासाठी विविध नाटिका, नाट्यछटा, गीते तसेच विविध अभिनव प्रयोगाच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्याबाबत खोकरपाट (ता अमळनेर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहमीच अग्रेसर राहिली आहे. पर्यायाने विद्यार्थ्यांच्या विविध सूप्त गुणांनाही वाव मिळत असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासही होत आहे. दुष्काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारा जगातील पहिला संत म्हणजे संत तुकाराम महाराज हे होते. ही अलौकिक घटना विद्यार्थ्यांना समजावी तसेच संत तुकाराम महाराज हे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबत काय कार्य करत होते ? याचीही माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी “संत तुकाराम” या नाटिकेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पटवून दिले आहे. “जे का रंजले गांजले.. त्यासी म्हणी जो आपुले… तोचि साधू ओळखावा… देव तेथेची जाणावा” या संत तुकाराम महाराजांच्या देवत्वाची व साधत्वाची नवीन व्याख्या या विद्यार्थ्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसह शिक्षकांना दाखवून दिली. प्रणव जयवीर पाटील या विद्यार्थ्याने संत तुकारामांची भूमिका साकारली. कार्तिकी हेमराज पाटील हिने कान्होबा तर अक्षदा मुकेश पाटील, दर्शना समाधान पाटील, अभिषेक सुनील सोनवणे, गायत्री संदीप माळची यांनी भाविकाची भूमिका बजावली.
शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी बडगुजर अध्यक्षस्थानी होत्या तर टीडीएफ चे कार्याध्यक्ष उमेश काटे, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक दीपककुमार पाटील, भैय्यासाहेब साळुंखे, महेंद्र पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापिका बडगुजर यांनी शाळेतील माझे प्रयोगालय, संतवाणी, भाकरीचा चंद्र, ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठीचे विशेष शिकवणी वर्ग यासह विविध उपक्रमा विषयीची माहिती दिली. यावेळी उमेश काटे व दीपककुमार पाटील यांनी शाळेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. दरम्यान नाटिकेतील उत्कृष्ट पात्र करणाऱ्या छोट्या कलाकार विद्यार्थ्यांना शिवशाही फाउंडेशन तर्फे बक्षिसे देण्यात आली. उपक्रमशील शिक्षक भैय्यासाहेब साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र पाटील यांनी आभार व्यक्त केले.