महिलेला अस्मितेची जाणीव होणे हाच खरा महिला दिन !

विश्वाच्या मानव निर्मितीत महत्वाचा घटक म्हणजे महिला आहे. तरी तिला पुरुषप्रधान संस्कृतीने कमी लेखण्याचा जो प्रयत्न झाला तो निंदनीय आहे. महिला शब्दातील म- म्हणजे महान. जी आपल्या कृतीने महत्ता प्राप्त करणारी, हि- म्हणजे हिम्मतवान, ला- म्हणजे आपल्या पराक्रमाने समोरच्याला लाजवणारी पराक्रमी. साऱ्या विश्वाला अन्नाची सोय करणारी म्हणजे कृषीचा शोध लावणारी. संगीत, हस्तकला, चित्रकला या कलेची सुरूवात करणारी कलाप्रेमी म्हणजे महिला होय. प्रत्येक देशात ह्या महिलेला दुय्यम स्थान देण्यात आले. काही कर्मठ देश आज सुध्दा आपली पुरुषप्रधान संस्कृती टिकवून ठेवत महिलेवर अन्याय करीत आहेत.

विदेशातही पुरुषाने निवडणुकीत मत देण्याचा अधिकार सुरुवातीला स्वत:कडे ठेवला. त्यासाठी महिलेला संघर्ष करावा लागला. महिला जागृत झाल्या व त्या हक्कासाठी लढल्या. युनायटेड स्टेट मध्ये ह्या महिला अधिकारासाठी पुढे आल्या. सुरुवातीला त्यांनी २८ फेब्रुवारी हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला. अनेक लहान मोठे संघटन झाले. १९१० ला आंतरराष्ट्रीय परिषदेत ८ मार्च हा दिवस महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आला. ८ मार्च ला रशियाच्या महिलांनी पहिल्या विश्वयुध्दाचा विरोध केला. शांततेसाठी ही मागणी केली. आज महिला पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहेत. तरी पुरुष आपली श्रेष्ठत्वाची गुढी उभारण्याचा प्रयत्न करतो. महिलेला कायम अज्ञानाच्या मार्गाकडे नेण्यासाठी मानवाचे हित न पाहणाऱ्या धर्माचा आधार घेतो. महिला त्याला बळी पडत आल्या आहेत. धर्माचे ठेकेदार जगात शांती ऐवजी द्वेष पसरवितात. धर्माची सक्ती करतात. धर्म हिंसेवर उभा करतात. हिंसेच्या कृतीतून मानवतेची भाषा करतात. जगात युद्धे धर्माच्या बंडाळीने झाले. प्रेम, करुणा, दया, अहिंसा या त्यांच्या बोलण्याच्या गोष्टी होत्या. प्रेमाने जग बदलते हे त्यांना मान्य नव्हते. महिलांना मंदिर, मस्जिद, चर्च यात प्रवेश नव्हता. महिलेला दुय्यम दर्जा जरी ती ह्या विश्वाच्या जडणघडणीत भूमिका बजावत असली तरी तिला किंमत नाही. मानव एकच पण त्यात वर्ण, जाती, धर्म यावरुन ह्या कर्मठ लोकांनी निसर्गानेच दिलेली समता नाकारली. आजही महिला कामकाजाच्या विळख्यात अटकलेली आहे. संतानी अतोनात मेहनत घेऊन खरा देव काय आहे हे समजून सांगितला. माणसातला देव शोधून दिला. तरी पुन्हा हे मनुवादी महिला सह बहुजनांना कर्मठ विचाराकडे नेण्यास यशस्वी झाले. असंख्य भोंदूंची फौज लागली कामाला अन पुन्हा धर्मांध कुविचार रुजतो आहे. महिलांना कर्मठ विचाराचे सुवाहक बनविले गेले आहे. संतांचा मानवमुक्तीचा विचार ते विसरले. संत गाडगेबाबा सारखा अडाणी माणूस खरा विचार समजून जगला. तो विचार पुसण्याचे काम आज चालू आहे.

महिलांनी जिजाऊ, सावित्रीमाई चे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे. स्वातंत्र्याच्या ह्या जगात आज ही महिला सुरक्षित नाही. दररोज महिलेवर अत्याचाराची बातमी येते. पेटून उठल्या पाहिजे महिला हया अन्यायाविरुद्ध तरच त्या जिजाऊ, सावित्रीमाई च्या लेकी म्हटल्या जातील. कित्येक धर्मात अजूनही महिलेला प्रार्थना स्थळावर प्रवेश नाही. भारतात बुध्द, जैन, चक्रधर, बसवेश्वर यांनी प्रथम महिलेला समान अधिकार दिला. तेव्हापासून खऱ्या अर्थाने महिलेला आराधना करता आली. आज सुध्दा महिलेच्या पाळी ला अपवित्र मानले जाते हे आधुनिक भारताला अशोभनीय आहे. शरीराच्या कार्याला अपवित्र मानणारे आम्ही लोक किती खुळे की, शरीराच्या नियमित क्रियेला तुच्छ मानतो. धर्माची जगावर सत्ता येण्यासाठी दुसऱ्या धर्माची लोक मारणारे कोणत्या विचाराने पवित्र होतील हे कोडे आहे. महिलांनी सशक्त विचार करणे, कर्मकांड नाकारणे, वैज्ञानिक गुढी रुजविणे, अन्याय झुगारणे हाच महिला दिन म्हणता येईल.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!