पंचासमक्ष घेतला माफीनामा व चांगल्या वर्तणुकीची हमी
अमळनेर : कोण केव्हा काय करेल याचा नेम नाही. सख्ख्या बहिणीने असाच काहीसा प्रकार बहिणीशी केल्याने गेली दीड वर्ष तिचा बहरलेला संसार मोडीत निघाला होता. पत्नीच्या सख्ख्या बहिणीशी पतीचे सूत जुळले अन् सारं काही बदलून गेलं. या पतीने पत्नी आशाचे (नाव बदलले ) तसेच ७ वर्षीय कन्येलाही वाऱ्यावर सोडले. सालीसोबत लग्न न करता धुळे येथे राजरोसपणे संसार थाटला. सख्ख्या बहिणीनेच आपल्या संसाराची वाताहत केल्याने आशाबाईने अमळनेर येथील महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार यांचे कडे धाव घेतली. या प्रकरणी समितीने लक्ष घातले अन् आशाबाईचा गेली दीड वर्ष दुभंगलेला संसार सुरळीत करण्यात समितीच्या कार्यकर्त्यांना यश आले.
धुळे येथे राजरोस सालीसोबत लग्न न करता संसार थाटणारा कैलास (बदलेलेले नाव) व सालीची कान उघडणी करण्यात आली. कायद्याचा धाक तसेच बहिणीच्या संसाराची झालेली वाताहत, दोन्ही परिवाराची होत असलेली बदनामी, दोघांच्या नोकरीवर बालंट येऊ शकते या बाबत समुपदेशन करण्यात आले. अखेर पंचासमक्ष माफीनामा व चांगल्या वर्तणुकीची लेखी हमी घेतल्यानंतर आशा नांदावयास गेली. तर.. बहिणीने पायावर लोळण घेत बहिणीच्या संसारात कधी व्यत्यय आणणार नाही म्हणत गाशा गुंढाळला.
या कामी अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीचे धनंजय सोनार, निशा विसपुते, मंगलाबाई, वैशाली शिंदे, राजकुमार कोराणी, विनोद राऊळ, अनिल चौधरी, बाळकृष्ण शिंदे आदींनी परिश्रम घेतले. या पूर्वी देखील अशा अनेक बाधित महिलांना न्याय मिळवून देण्याचे काम अमळनेर महिला अन्याय विरोधी समितीने केले आहे.