अमळनेर मध्ये शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्ती विरोधात राज्यव्यापी शिक्षक संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा पत्रकाद्वारे इशारा

खा. शि. मंडळ शिक्षक भरती च्या वादात प्रा. अशोक पवार व माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांच्यात शाब्दिक चकमक

अमळनेर : येथील खा. शि. मंडळाने केलेली शिक्षक भरती चा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. न्यायालय जो काही निकाल देईल तो सर्वांना मान्य असेल. पण.. शासकीय अधिकाऱ्यांवर दडपण आणून व आत्मदहनाची भीती दाखवून चुकीचे आदेश करायला भाग पाडतात. आम्ही काही मेलेल्या आईचे दूध प्यालेलो नाहीत. आम्ही राजकारण करीत नाहीत. न्यायालयात न्यायप्रविष्ट बाब आहे म्हणून बोलतो, आमच्या जवळ खरी कागदपत्रे आहेत म्हणून बोलतो.. उगाच बोलत नाही. खा. शि. मंडळाच्या एकाही संचालकाने या प्रकरणी साधा निषेध नोंदवला नाही. साने गुरुजींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोटन चौधरी व दिलीप जैन यांचा आम्ही निषेध करतो. हिंमत असेल तर दिलीप जैन यांनी खा. शि. मंडळावर अध्यक्ष असताना पैसे  घेतले नाहीत असं भगवान महावीर यांच्या मुर्तीवर हात ठेवून सांगावं. आपलं आशीर्वाद देण्याचं वय असताना कुणाचा शाप कशाला घेता ? असा सवाल प्रा. अशोक पवार यांनी व्यक्त केला. अमळनेर येथील खान्देश शिक्षण मंडळातील २२ प्राध्यापकांच्या व हितचिंतकांच्या वतीने मराठा मंगल कार्यालयात काल दुपारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसोबत पत्रकार परिषद भरविण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सोबत विचार मंचावर माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, कायदेशीर सल्लागार ॲड. किरण पाटील, मराठा संघाचे विक्रांत पाटील, भूषण भदाणे, जितेंद्र  देशमुख, गरुड सर उपस्थित होते.

प्रताप ज्युनिअर कॉलेज अमळनेर येथे १८ शिक्षकांची दिनांक ५ जानेवारी २०१७ रोजी नियमानुसार नियुक्ती करण्यात आली होती. सर्व जागा अनुदानित सेवानिवृत्त शिक्षकांच्या होत्या. सात वर्षांपासून सदस्य कार्यरत आहेत. रिट पिटिशन क्र. ११५६० / २०१७ नुसार २५ सप्टेंबर २०१७ च्या आदेशात शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी १८ शिक्षकांच्या मान्यतेबाबत निर्णय घ्यावा असे म्हटले होते. त्यानुसार शिक्षण उपसंचालक, नाशिक यांनी मान्यता दिली होती. १८ शिक्षकांचा शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यावर महाविद्यालयाने कायम मान्यता दिली आहे व मा. हायकोर्ट खंडपीठ संभाजीनगर यांनी शालार्थ प्रणाली प्रमाणे १८ शिक्षकांचे पगार करण्याचे आदेश दिले होते. लोटन महारु चौधरी यांनी १८ उपशिक्षकांच्या विरुद्ध रिट पिटिशन क्र.९२९२ / २०१८ व ९२८४ / २०१८ या दोन्ही याचिकेमध्ये अठरा उपशिक्षकांच्या मान्यतेबाबत लोटन महारु चौधरी यांच्या बाजूने किंवा उपशिक्षकांच्या विरुद्ध कोणताही आदेश पारित केला नाही अशी वस्तुस्थिती असताना, ते अधिकाऱ्यांना व प्रसार माध्यमांना दिशाभूल करणारी खोटी माहिती सातत्याने देत आहेत. अधिकाऱ्यांवर दडपण आणून व आत्मदहनाची भीती दाखवून चुकीचे आदेश करायला भाग पाडतात. न्यायालयाचा अवमान करतात. शिक्षकांची व संस्थेची बदनामी करतात. साने गुरुजींचे नाव वापरून अमळनेरची व साने गुरुजींची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न लोटन चौधरी व दिलीप जैन करीत आहेत. ते जनहिताचे काम करीत नाही तर सुडाचे, द्वेषाचे व स्वार्थाचे राजकारण करीत आहेत. त्यांचे विरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी प्रताप महाविद्यालयातील २६ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केली आहे. २६ पैकी एकाही शिक्षकाला शासनाने अगर खा. शि. मंडळांने निलंबित केलेले नाही. असे असताना अमळनेर मध्ये शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण करणाऱ्या अपप्रवृत्ती विरोधात राज्यव्यापी शिक्षक संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा पत्रकाद्वारे देण्यात आला आहे. या पत्रकावर नागरिकांचे प्रतिनिधी अमोल पाटील, शिक्षक नेते प्रा. अशोक पवार, कायदेशीर सल्लागार ॲड. किरण पाटील, शिक्षक प्रतिनिधी प्रा. स्वप्निल पवार यांच्या सह्या आहेत.

भाषण हट्टापायी शाब्दिक चकमक.. असभ्यतेचे दर्शन..

माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील (आबा ) तसे रोखठोक.. ताकाला जाऊन भांडे लपविणारे नाहीत. आयोजकांनी त्यांना निमंत्रण दिले हा त्यांचा सन्मान होता. मुळातच आबा उशिराने कार्यक्रमात हजर झाले. विचार मंचावर जास्तीची खुर्ची नसताना आयोजकांनी विचार मंचावर स्थान दिले. प्रोटोकॉल नुसार काहींनी आपले विचार मांडले. त्यानंतर आबांनी आयोजकांकडे भाषण करण्याची ईच्छा व्यक्त केली. पण.. पत्रकार परिषद असल्याने प्रा. अशोक पवार यांनी आबांना भाषण करण्यास नकार दिला. आयोजकांनी भाषण करण्यास नकार देऊनही ‘मला माझं मत कां मांडू देत नाहीत ?’ असा मुद्दा आबांनी उपस्थित केल्याने वादाची ठिणगी पडली. अन्.. खा. शि. च्या शिक्षक भरती वादात प्रा. अशोक पवार व डॉ. बी. एस. पाटील आमने सामने येऊन शाब्दिक चकमक झाली. उपस्थितांनी मध्यस्थी करत वाद शमविला. खरं तर.. शिक्षक भरती प्रक्रियेत नेमणूक झालेल्या शिक्षकांची कोणतीही चूक नसल्याने त्यांचेवर अन्याय होऊ नये अशीच दोघांचीही भूमिका होती. मात्र.. आबांचा भाषणाचा हट्ट अंगाशी आला. एकंदरीत दोन्ही उच्चशिक्षित जाणकारांनी असभ्यतेचे दर्शन घडविले हे मात्र खरं.

‘प्रश्न आमचा.. आवाज आमचा..’

‘आमच्या प्रश्नावर एवढे दिवस कोणीच का बोलला नाहीत ? बोलायचेच असेल तर स्वतंत्र पत्रकार परिषद घ्या व आपले म्हणणे मांडा’ असा सल्ला शिक्षकांच्या वतीने ‘प्रश्न आमचा.. आवाज आमचा..’ घोषणा देत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना देण्यात आला.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!