चक्कर येऊन पडल्याने शारदा माध्यमिक विद्यालय, कळमसरे चा विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन चे निधन

कळमसरे : अमळनेर तालुक्यातील कळमसरे येथील शारदा माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता नववीतला विद्यार्थी घनश्याम जितेंद्र महाजन हा चक्कर येऊन पडल्याने त्याचे निधन झाले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनश्याम जितेंद्र महाजन (वय १५) हा काल शाळेत शेवटच्या तासाला साडेचार च्या सुमारास संध्याकाळी शाळेच्या पटांगणात खेळत असताना अचानक चक्कर येऊन पडला. त्यावेळेस शिक्षकांनी त्याला सावरले. स्थानिक डॉक्टरांनी तपासणी करत त्याच्यावर प्रथमोपचार केले व त्वरीत अमळनेर येथे डॉ. निखिल बहुगुणे यांच्या दवाखान्यात भरती केले. डॉ. निखिल बहुगुणे यांनी तपासून अमळनेर ग्रामीण रुग्णालयात पाठवले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जी. एम. पाटील यांनी तपासून मृत घोषित केले.

घनश्याम हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडील शेतकरी असल्याने तो शाळेबरोबरच त्यांना शेतातही मदत करीत असे. अत्यंत नम्र व हुशार असलेला हा गुणी विद्यार्थी क्रीडा, नाटक सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी सर्व कार्यक्रमात भाग घेणारा व शाळेच्या शिक्षकांचा अत्यंत आवडता होता. घनश्यामच्या अचानक जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. शाळेचे संस्थाध्यक्ष, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक यांनी अमळनेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्याच्या पश्चात आई, वडील, आजी, आजोबा, काका व दोन बहिणी असा परिवार आहे. अमळनेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन होऊन मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!