अमळनेर : राज्यासह तालुक्यातील परतीच्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना तसेच अन्य बाधितांना विशेष पॅकेज जाहीर करुन मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कृषिभूषण मा.आ. साहेबराव पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खरीप- २०१९ हंगामातील अवकाळी पावसाने अवघ्या महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त झालेला आहे. हातातली सर्वच पिके पावसाने वाया गेली आहेत. अश्या ह्या संकटकाळी शेतकऱ्यांना खरीप हंगामाची नुकसान भरपाई देण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना सन २०१५ ते २०२० या कालावधी मध्ये द्यावयाच्या मदतीच्या संदर्भातील शासन निर्णय दिनांक १३ मे, २०१५ अन्वये, प्रचलित दरापेक्षा अधिक दराने मदत देण्याची मागणी मोठया प्रमाणात शासनाकडे केली आहे. ही बाब लक्षात घेता, आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना अशा प्रकारे झालेले एकंदरीत नुकसान व शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शेती/फळ पिकांच्या तीव्र स्वरुपात झालेल्या नुकसानीच्या आधारे आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टीने, एक विशेष बाब म्हणून पॅकेज जाहीर करुन मंजूरी द्यावी.
महाराष्ट्र शासन-शासन निर्णय क्रमांक २०१४/प्र.प्रा.११८/म-३ क्रमांक ३४६ दिनांक २० मार्च २०१४ अन्वये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानाकरीता आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना व अन्य बांधितांना विशेष पॅकेज जाहीर केले होते. यानुसार, कोरडवाहू शेतीस प्रचलित दरानुसार “रुपये ६,८००” प्रती हेक्टर या व्यतिरिक्त अधिकची विशेष रक्कम रुपये “१३,२००” प्रती हेक्टर अशी एकूण रुपये “२०,००० हजार इतकी, ओतिलाखालील शेतास प्रचलित दरानुसार रुपये “१३,५००” प्रती हेक्टर या व्यतिरिक्त अधिकची विशेष रक्कम रुपये “१६,५००” प्रती हेक्टर अशी एकूण रक्कम रुपये “३०,०००” हजार इतकी आणि बहुवार्षिक फळपिकांकरिता प्रचलित दरानुसार रुपये “१८,०००” प्रती हेक्टर या व्यतिरिक्त अधिकची विशेष रक्कम “३२,०००” प्रती हेक्टर अशी एकूण रक्कम रुपये “५०,०००” इतकी मदत जाहीर केली होती.
त्याच धर्तीवर प्रचलित दरानुसार दिल्या जाणाऱ्या रक्कमे व्यतिरिक्त अधिकच्या विशेष रक्कमेसह कमीत कमी.” कोरडवाहू शेतीस “रुपये २०,००० ” प्रती हेक्टर, ओलिता खालील शेतीस “रुपये ३०,०००” प्रती हेक्टर आणि बहुवार्षिक फळपिकांकरीता रुपये “५०,०००” प्रती हेक्टर या प्रमाणे सरसकट मदत देण्यात यावी. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला आहे, त्यांनाही विमा कंपन्यांकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी संबधित कंपन्यांनाही तात्काळ निर्देश द्यावेत.
बाधित आपद्ग्रस्त शेतकऱ्यांची “जानेवारी २०१९ ते मार्च २०२०” या कालावधीची वीज देयके राज्य शासनामार्फत भरण्यात येवून आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना खरीप २०१९ या हंगामातील नुकसान भरपाईसह पशुधनासाठी वैरणाचीही मदत लवकरात लवकर मिळावी. जेणेकरुन बळीराजाला रब्बी हंगामाला त्याची मदत होईल आणि महाराष्ट्रातील बळीराजाच्या डोळ्यातील अश्रु पुसले जातील.