भाजपा कार्यकर्त्यांनी मंगळग्रह देवाला घातला महाअभिषेक

अमळनेर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूून देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची तारीख निश्चित होत नसताना ते मंगळी असल्याची माहिती अमळनेर येथील भाजपा कार्यकर्त्याना मिळताच त्यांनी आ.सौ स्मिता वाघ व माजी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली थेट अमळनेर येथील मंगळग्रह मंदिर गाठून मंगळ आडवा येऊ नये यासाठी विधिवत महाअभिषेक केला. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना महायुतीला जनादेश मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे आला आहे. जागा वाटपावरून युतीत घोडे अडल्याने महायुतीची सत्ता स्थापन होण्यास विलंब होत असून मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख लांबत चालली आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या पाच वर्षात उत्तम काम केले असून पुन्हा तेच नेतृत्व राज्याला लाभावे अशी भाजप प्रेमी व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. तिढा सुटत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या कार्यात मंगळ आडवा येत असल्याची माहिती अमळनेर येथील भाजपा कार्यकर्त्याना मिळाल्यानंतर त्यांनी भारतात अमळनेर व कलकत्ता या दोनच ठिकाणी मंगळग्रह देवाची मंदिरे असल्याने आ.स्मिता वाघ व उदय वाघ यांचे निवासस्थान गाठून यासंदर्भात चर्चा केली व त्यांच्या सूचनेनुसार सत्ता स्थापनेत मंगळ आडवा येऊ नये यासाठी मंगळग्रह मंदिर गाठून पुरोहितांच्या उपस्थितीत सुमारे दोन तास विधिवत महाअभिषेक केला.

यावेळी अमळनेर बाजार समितीचे सभापती प्रफुल्ल पवार,भाजपा शहराध्यक्ष शितल देशमुख, तालुका सरचिटणीस जिजाबराव पाटील, उमेश वाल्हे, शालिग्राम पवार भटक्या विमुक्त जाती आघाडी अध्यक्ष नाटेश्वर पाटील, राकेश पाटील, राजू पवार, दिपक पाटील, सरपंच कैलास पाटील, किर्तीलाल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष योगिराज चव्हाण, देवा लांडगे, कल्पेश पाटील, दौलाभाऊ, शुभम पाटील, भूषण पाटील, महावीर मोरे, अभिषेक पाटील, राजेश वाघ, राहुल चौधरी, असिफ पिंजारी आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी देखील यावेळी उपस्थिती दिली.

कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीस साहेबांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान करणार : आमदार स्मिता वाघ
संपूर्ण राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात सापडला असून या राजाला धीर देण्यासाठी आणि या सुलतानी संकटातून बाहेर काढण्यासाठी लवकरात लवकर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत ही तमाम शेतकरी बांधवांची आणि जनतेची इच्छा आहे. खरेतर तो दिवस दूर नाहीच हा आमचा विश्वास आहे. परंतु भावनाशील झालेल्या कार्यकर्त्यानी मंगळ आडवा येऊ नये यासाठी महाअभिषेेे़क करून देवाजवळ आपल्या प्रेमळ भावना व्यक्त केल्या आहेत. अशा लाखो कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीस यांच्या पाठीशी असून याच भावनांचे फलित म्हणून लवकरच सत्तास्थापनेचा तिढा सुटून फडणवीस मुख्यमंत्री होणार असा विश्वास आमदार स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे.

Share this news:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!