आमदार अनिल भाईदास पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे केली कडक मोहीम राबविण्याची पत्राद्वारे मागणी. त्वरित कारवाई न झाल्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी रस्त्यावर उतरून व्यापक स्वरूपात आंदोलन करणार.

अमळनेर : शहरात गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. यामुळेच सर्वसामान्य जनता आणि महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा व अवैध धंदे बंद करावेत, अशी मागणी आमदार अनिल भाईदास पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याकडे पत्राद्वारे केली असून सविस्तर चर्चाही केली.
दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शहरात सध्या मोठ्या प्रमाणात गुंडगिरीचे प्रमाण वाढले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये भिती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ठिकठिकाणी अवैध धंदे वाढले असून लोटगाड्यांवर अवैध दारू खुले आम विक्री होत आहे. काही ठिकाणी सट्टा जुगार अड्डे तर काही ठिकाणी मादक पदार्थ विक्री होत आहेत. गेल्या पाच वर्षात हे गुंड मोठ्या प्रमाणात पोसले गेले आहेत. यामुळेच सर्वसामान्य जनता व महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बाजार पेठेत काला पिला सारखे गेम चालवून दिवसाढवळ्या ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांची लूट होत आहे. शहरात रात्री १० ते ११ वाजेच्या सुमारास जबरी लूट करण्याचे प्रकार दोन दिवसांत वाढले आहेत. यात पालिकेचे उपमुख्याधिकारी व एक दोन घटना घडल्या आहेत. अशा गुंडांना कधीही राजकीय आश्रय मिळणार नाही. यासाठी शहरात वॉश आऊट सारखी अथवा सर्च ऑपरेशन सारखी मोहीम आखावी यासाठी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आय दोनही पक्ष पोलिसांच्या पाठीशी राहतील. त्यामुळे त्वरित कारवाई करावी अन्यथा.. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला रस्त्यावर उतरून व्यापक स्वरूपात आंदोलन उभारावे लागेल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी याबाबत त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.