मुलं आपल्या आई बापाचे डायपर वृद्धावस्थेत बदलतील, त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांचे कर्तृत्व सिद्ध होईल : डॉ. जयदीप पाटील

अमळनेर : येथील उत्कर्ष खानदेशी अधिकारी व अमळनेर विकास मंचने चांगल्या लोकांचा सन्मान करण्याचे पवित्र कार्य सुरु केले ही निश्चितच आनंद देणारी गोष्ट आहे. विकास मंचने गाव तेथे ग्रंथालय, अभ्यासिका सुरु करुन अमळनेेर येथे एखादे स्पर्धा परीक्षा केंद्र होण्यासाठी प्रयत्न करावेत. स्पर्धा परीक्षांचे चित्र नकारात्मक पणे न रंगविता तरुणांचे प्रश्न आणि दशा समजून घेतली तर समाजाला दिशा मिळेल. शिकून कितीही उंचीवर गेलात, मोठे झालात तरी जन्मभूमीला विसरु नका असे मत माजी आय आर एस अधिकारी डॉ. उज्वलकुमार चव्हाण यांनी व्यक्त केले. अमळनेर येथील बजरंग पॅलेसमध्ये उत्कर्ष खानदेशी अधिकारी व अमळनेर विकास मंच तर्फे आयोजित कर्तृत्वाचा महासन्मान या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. सोबत मंचावर सारथी – पुणे चे उपव्यवस्थापक अनिल पवार, मंगळ ग्रह संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, नोबेल फाउंडेशनचे संचालक डॉ. जयदीप पाटील, डीवायएसपी सुनील नंदवाळकर, बालरोग तज्ञ डॉ. शरद बाविस्कर होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविकातून कपिल पवार यांनी विकास मंच ची भूमिका विशद केली. याप्रसंगी डी.लिट सन्मानमूर्ती डॉ. डिगंबर महाले व डॉ. जयदीप पाटील यांचा सन्मान शाल, स्मृतीचिन्ह, भेटवस्तू देऊन करण्यात आला. सोबतच मंचावरील प्रमुख मान्यवरांचा व विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश संपादन करणाऱ्या यशवंतांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त प्राचार्य एस. आर. चौधरी, साने गुरुजी शाळेचे माजी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, खानदेश शिक्षण मंडळाचे निरज अग्रवाल, सर्पमित्र गणेश शिंगारे, श्री व सौ. गिरीश पाटील, उपस्थित पत्रकार बांधव यांचाही सत्कार करण्यात आला.

डॉ. जयदीप पाटील म्हणाले की, खानदेशची सांस्कृतिक राजधानी करावयाची असेल तर अमळनेर चे नाव पुढे येईल. येथे विचार, सेवा, देशभक्ती चा उत्तम वारसा आहे.. पण योग्य वेळी लगाम लावावाच लागतो. अमळनेरची संस्कृती व मातीच सुंदर आहे. ‘कर्तृत्व’ या शब्दाला खूप महत्त्व आहे. आता तर हवं ते देण्यासाठी गुगल बाबा बसले आहेत. ते एक दुधारी तलवार असल्यासारखे आहे. पण.. काय घ्यायचं ? हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. देशातील सर्वात मोठी समस्या सोडवायची असेल तर भारतातील लोकांच्या हातातील मोबाईल काढणे. कुटुंबातील वृध्द व्यक्तीशी कोणी बोलत नाही. वयोवृद्ध लोकांसाठी काहीतरी करावे लागेल. पाहिलेला अनुभव सांगताना ६५ लोकांची क्षमता असलेल्या वृध्दाश्रमात आधीच ३५० वेटींग असणं ही लाजीरवाणी गोष्ट आहे. सालदाराचा बाप कधीही वृद्धाश्रमात नसतो पण सुशिक्षितांचा दिसतो. तंत्रज्ञानाने पुढे गेलेले पिढी खरंच आपली ताकद बनते की, वेगळं काय करते हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तरुणांना दिशा देण्याची गरज आहे. यशाने मोठी झालेली ही मुलं ज्यावेळी आपल्या आई बापाचे डायपर वृद्धावस्थेत बदलतील त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांचे कर्तृत्व सिद्ध होईल. तरुणांनी बुद्धीच्या मशागती सोबत मनाची मशागत करूनच अधिकारी व्हावं अशी अपेक्षा व्यक्त केली.
डॉ. डिगंबर महाले म्हणाले की, मी डी.लिट पदवी घेण्यासाठी जाताना पत्नीला हृदयात सामावून मित्रपरिवार सोबत नेला. कारण.. पत्नी सोबत जे शेअर करू शकत नाही ते मित्रासोबत शेअर करता येते. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचा घात कोणी केला असेल तर तो मित्रांनी केला. पण.. मी एवढा भाग्यवान आहे की, मित्रांमुळे मी व्यासपीठावर असतो तर माझे मित्र खाली असतात. मी त्यांच्यासमोर आहे त्यांच्या असण्यामुळेच मला हा मान मिळतो. छत्रपतींनी मावळ्यांना स्थान दिलं होतं. आजच्या जगात बापाचं मुलगा ऐकत नाही पण.. माझे मित्र माझ्यापेक्षा वयाने मोठे असूनही माझा शब्द पाळतात. यामुळे मिळालेला हा सन्मान व यश मी मित्रांना समर्पित करतो हे सांगताना ते भाऊक होऊन नि:शब्द झाले. ज्यांनी आई-वडील नसताना यश मिळविले ते पोरके नाहीत असे सांगत मायेचा आधार दिला.
सारथी चे उपव्यवस्थापक अनिल पवार म्हणाले की, ज्या पदावर तुम्ही काम करतात त्या पदाची गनिमा कशी राखायची ? हे महत्त्वाचे. समाजाच्या उपयोगासाठी काम करावं. सारथी संस्थेत गरजू तरुणांसाठी सुरु असलेल्या योजना सांगितल्या. पुणे कोल्हापूर सारखे जिल्हे सोडले तर आपले विद्यार्थी लाभार्थी दिसत नाहीत. सुरुवातीला या योजना फक्त आदिवासी विद्यार्थ्यांसाठी होत्या. त्यानंतर मागास विद्यार्थ्यांसाठी, व समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी या योजना राबविण्यात येत आहेत. तरुणांनी लाभ घ्यावा असे सांगितले. सूत्रसंचालन मयूर पाटील यांनी केले तर आभार उमेश काटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विविध सामाजिक संस्था व विकास मंच च्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
