झोपलेली यंत्रणा.. आता तरी जागे होणार का ?

अमळनेर : धोक्याच्या ठिकाणी संबंधित यंत्रणेने लक्ष द्यायला हवे परंतु त्याकडे संबंधित यंत्रणा वेळीच लक्ष देत नाही. यामुळे आज पुन्हा असाच काहीसा प्रकार घडला. एक स्कूटर स्वार चोपडा रस्त्यावरुन जात असताना स्मशानभूमीच्या पुढे ताडेपुरा नाक्याजवळ म्हैस आडवी आल्याने वाचविण्याच्या नादात वाहनासह फरशीवरून थेट नाल्यातच पडला. या नाल्यात अनेक दिवसापासून साचलेले दुर्गंधीयुक्त पाणी असल्याने वाहन चालक कमरेपर्यंत गाळात रुतून बसला होता. आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान दाखवून संबंधित स्कूटर स्वाराला वाचविले. या स्कूटर स्वाराचे दोन किमती मोबाईल पाण्यातच गहाळ झाले. स्कूटरचेही नुकसान झाले आहे.
चोपडा रोडवर स्मशानभूमीच्या पुढे ताडेपुरा नाला असून या नाल्यात दुर्गंधीयुक्त पाणी असते. शहरातून चोपडा जाणारी सर्वच वाहने या रस्त्याने हे ज करत असतात तेथे जवळच मंगळ ग्रह मंदिर आहे. या मंदिरावर तालुक्यातीलच नव्हे तर देशभरातील लाखो भाविक दर्शनासाठी येतात. असे असताना या नाल्याच्या फरशीवर संरक्षक कठडे बांधलेले नाहीत. यामुळे यापूर्वी देखील वाहनांचे अपघात घडले आहेत, प्राणी देखील पडून मृत झाले आहेत. कदाचित संबंधित यंत्रणा या रस्त्यावर फिरकत नसावी किंवा झोपलेल्या यंत्रणेला हे प्रकार लक्षात आले नसावे. खरंतर यापूर्वीच अशा धोकेदायक पुलावर संबंधित यंत्रणेने तातडीने संरक्षक कठडे बांधायला हवे होते. आता तरी झोपलेली यंत्रणा जागे होणार का ? असा प्रश्न आहे. या नाल्यावर संरक्षक कठडे न बांधल्यास आंदोलन करण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
