राजकीय नेते सोयीचे राजकारण करतात, आपापसात पदे वाटून घेतात; आता कार्यकर्त्यांनी सावध व्हायला हवे
पत्रकार परिषदेत आमदार व माजी आमदारांवर प्रश्नांची बरसात

अमळनेर : तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या ढवळून निघाले आहे. नुकतीच माजी आमदार शिरीष चौधरी यांनी न्यायालयात साक्ष फिरवली. यामागे मंत्री अनिल पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील आणि शिरीष चौधरी यांची काही गुप्त चर्चा, काही राजकीय तडजोड झाली आहे का ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष श्याम पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.
श्याम पाटील म्हणाले की, २०१४ ची विधानसभा निवडणूक लागली होती. पैसे वाटपाच्या संशयावरून शिरीष चौधरी यांच्या व आमच्या गटात चकमक झाली. तेव्हा आमच्यावर गुन्हे दाखल झाले. त्यावेळी आम्हाला अनिल पाटील अथवा साहेबराव पाटील यांनी कोणतीच मदत केली नाही. मात्र २०१६ च्या नगरपालिका निवडणुकी वेळी झालेल्या भानगडीत अनिल पाटील व साहेबराव पाटील हे देखील आरोपी होते म्हणून साक्ष पुरवण्यात आली का ? त्यासाठी तडजोड आहे का ? मंत्री अनिल पाटील यांनी नुकतेच कार्यकर्त्यांच्या बैठकीत एक वक्तव्य केले की, विरोधातील दहा उमेदवारांपैकी नऊ आमचे असतील त्यामुळे २०१६ मधील गुन्ह्याला राजकीय वास येत आहे. यामुळे आता कार्यकर्त्यांनी सावध व्हायला हवे. राजकीय नेतेमंडळी सोयीचे राजकारण करतात, आपापसात पदे वाटून तडजोड करतात.
२०१४ ते २०१९ दरम्यान जळगाव जिल्हा दूध संघ व जिल्हा बँकेची निवडणूक झाली. यावेळी शिरीष चौधरींनी आपल्या कार्यकर्त्यांना संधी का दिली नाही ? अनिल पाटलांच्या विरोधात भूमिका का घेतली नाही ? निवडणुका बिनविरोध कशा झाल्या ? आता म्हणता की मला मुख्यमंत्र्यांकडून कुठल्याही पदाची ऑफर जरी आली तरी मी मंत्री अनिल पाटलांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी लढणार. तर मग या निवडणुका झाल्या तेव्हा कुठे गेले होते. आमदारांनी एकही आमसभा घेतली नाही अशा आशयाची पत्रकबाजी देखील भाजपाच्या कार्यकर्त्यांने केली होती. शिरीष चौधरी भाजप सोबत असताना तेव्हादेखील गप्प होते. आवाज का उठवला नाही ? २०१४ ते २०१९ का बोलले नाही आणि परत केस मागे घेतात. १० पैकी ९ उमेदवार आमच्या कडे असतील असे मंत्री सांगतात यावरुन
सुरत इंदोर सारख्या निवडणुकांच्या त्या दिशेने आम्हाला नेणार आहात का ? अमळनेरची जहागीरदारी वाटून घेणार आहेत का ? नगर परिषद, विधान परिषद, विधानसभा वाटप करुन घेणार आहेत का ? जनतेच्या मताचा व लोकशाहीचा आदर करणार आहात की नाही ? त्याचप्रमाणे सन २०१४ ते २०१९ मध्ये शिरीष चौधरी आमदार असताना अनिल पाटील यांनी ५४ कोटींची कामे केली असे शिरीष चौधरी यांनीच जाहीर केले होते. सन २०१९ ते २०२४ दरम्यान अनिल पाटील आमदार असताना शिरीष चौधरी यांच्या निकटवर्तीयांनी मंत्री अनिल पाटील यांची मंजूर कामे केली. यामागचे नेमके गौडबंगाल काय ? असाही प्रश्न राजकीय, सामाजिक कार्यकर्ता म्हणून उपस्थित केला.
शासनाचा ‘कृषीभूषण पुरस्कार’ देखील घरातच…
मंत्री अनिल पाटील आमदार, प्रतोद, मंत्री, पालकमंत्री झालेत. घरातील जयश्रीताई पाटील जिल्हा परिषद सदस्य होत्या. नंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी प्रयत्न केले. त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद दिले आणि आता लाडकी बहीण योजनेचे अध्यक्षपदही दिले. एका घरातच पदे का ? मंत्री अनिल पाटील यांच्या घरात एवढी पदे असूनही शासनाकडून मिळणारा ‘कृषीभूषण पुरस्कार’ देखील घरातच कसा दिला गेला ? असा सवाल मंत्री अनिल पाटील व सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांना केला. शासनाकडून मिळणारा ‘कृषीभूषण पुरस्कार’ जाहीर करताना मंत्री व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तालुक्यात योग्य असा कष्टकरी शेतकरी दिसला नाही का ? यावर कोणीच काही बोलत नाही. येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी करणारेही यावर बोलत नाहीत. यावर तुम्ही बोलत नसाल तर तुमची कुठेतरी सेटलमेंट झाली असावी असाही आरोप श्याम पाटील यांनी केला.
अमळनेर विकासाच्या मार्गावर न्यायचे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर, क्रांतिवीरांगणा लीलाताई पाटील, उत्तमराव पाटील, प्रेमाचा संदेश देणारे साने गुरुजी यांच्या विचारांच्या मार्गावर व श्रीमंत प्रताप शेठजींच्या उद्योगाच्या मार्गावर न्यायचे असेल तर आपण यांचा खरा चेहरा उघड करुन त्यांना जाब विचारला पाहिजे. दरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी बोलताना बळी पडू नये. निवडणूक असल्याने खोटे नाटे बतावणी करून हे दिशाभूल करतात. नागरिकांनीही योग्य त्या उमेदवाराची निवड करणे गरजेचे आहे. सर्व स्वार्थी राजकारणी असून स्वतःच्या फायद्यासाठी जनतेस वेठीस धरत असतील तर येणाऱ्या निवडणुकीत आम्ही यांना धडा शिकविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. असे सगळे चेहरे जनतेसमोर उघडकीस आणून महाविकास आघाडीचा झेंडा सत्तेत आणल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.