अमळनेर येथील सकल धनगर समाज व मौर्य क्रांती संघाच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी साजरी

अमळनेर : ज्यांनी समाजासाठी, राज्यातील प्रजेसाठी आपलं आयुष्य खर्ची घातले आहे, जे समाजासाठी आदर्श आहेत, त्यांची प्रेरणा घेता यावी अशा व्यक्तीची पुण्यतिथी साजरी करावी. नव्या पिढीला या थोरांचे विचार आचरणात आणता यावे, त्यांचा आदर्श माहित व्हावा हा त्या मागचा उद्देश. पुण्यश्लोक, आदर्श राजमाता व देवी अशा तीन पदव्या ज्यांच्या नावापुढे लागल्या असे महान कार्य करणाऱ्या त्या अहिल्याबाई होळकर होत. त्यांचं कार्य पुढे नेण्याचे काम मौर्य क्रांती सेना करीत असून अध्यक्षपदाचा मान दिल्याबद्दल आभार मानले. पुण्यतिथी का साजरी करावी ? या प्रश्नाचे कोडे उलगडत सांगताना, कुठली पुण्यतिथी अशीच साजरी होत नाही अथवा फोटोतील गळ्यात फुलांच्या माळा सहजासहजी पडत नाहीत तर त्या व्यक्तीचं महान कार्य ते करायला भाग पाडते असे मत अहिल्यादेवी विद्या प्रसारक मंडळ बोर्डिंग जळगाव चे माजी अध्यक्ष हभप विट्ठलराव बोरसे यांनी अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. अमळनेर येथील सकल धनगर समाज व मौर्य क्रांती संघाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी मंगळवार, दिनांक १३ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. सोबत विचार मंचावर आर. सी. भालेराव, बन्सीलाल भागवत गुरुजी, प्रा. अशोक पवार, संदीप घोरपडे, अल्लामा खैराबादी स्टडी सेंटर चे रियाज भाई शेख, सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रा. सुभाष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक समाधान धनगर, संजय शिरसाठ, न. पा. शिक्षण मंडळाचे माजी सभापती नितीन निळे होते. उपस्थितांनी अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन केल्यावर प्रमुख मान्यवरांचे शाल, बुके व संघर्ष मूर्ती अहिल्याई पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मौर्य क्रांती सेनेचे राज्य उपाध्यक्ष बन्सीलाल भागवत गुरुजी यांनी केले. ते म्हणाले की, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी बुद्धी, साहस आणि चातुर्याच्या जोरावर तीस वर्ष न्यायाचे राज्य केले. मानवतावादी दृष्टिकोन ठेवून समाजात एकात्मता निर्माण केली. अशा कर्तृत्ववान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य घराघरात पोहोचवा असे आवाहन केले. समाजातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी जळगाव येथे रोजगार मेळावा मार्गदर्शन, वकृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान असे उपक्रम राबविण्याबाबत माहिती दिली.
राष्ट्रीय विचार प्रबोधन चळवळ प्रभावीपणे राबविणारे युवा कल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष प्रा. अशोक पवार यांनी अहिल्याबाई होळकर यांची जयंती ३०० ठिकाणी व्याख्यान कार्यक्रम घेऊन साजरी करु असे आश्वासित केले. सामाजिक कार्यकर्त्या दर्शना पवार यांनी अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृती जागवण्यासाठी साने गुरुजी कर्मभूमी परिसरात ३०० झाडे लावू व त्यांचे संगोपन व संवर्धन करुन ‘अहिल्यादेवी गार्डन’ असे नामकरण करण्यात येईल अशी माहिती दिली.
आपल्या मनोगतात संदीप घोरपडे म्हणाले की, पूर्वी समतेची आपलेपणाची भावना होती. राजाला सिंहासनावर बसल्यासारखे वाटायचं. अहिल्यादेवींनी समतेची, आपलेपणाची भावना निर्माण केली. ते साधेपण गेलं आणि आता चटक-मटक आलं. एखाद्या राजकीय पदावर साधा सदस्य म्हणून निवडून आले तरी स्वतःला राजा समजू लागतात. त्यांना स्वर्ग दोन बोट उरते. सामान्य माणसाची गाऱ्हाणी ऐकणारी व न्याय देणारी थोर माणसं आता दिसत नाहीत. अहिल्यादेवींच्या प्रचार प्रसार कार्यक्रमात मी सामील होईलच. पण धनगर समाजाला सुद्धा अहिल्याबाई माहीत नाहीत अशी खंतही व्यक्त केली. धनगर समाजाच्या जनतेला आपली खरी आई माहीत व्हावी यासाठी मी स्वतः गावा गावात जाऊन अहिल्यादेवींचे विचारांचा प्रचार व प्रसार करेन अशी ग्वाही दिली.
रियाज भाई शेख यांनी शेर शायरी करत थोरांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मौर्य क्रांती संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र लाळगे, उपजिल्हाध्यक्ष रामचंद्र भालेराव, सुभाष जिभाऊ, डी. ए. पाटील, सोपान भवरे यांनीही मनोगत व्यक्त करताना महापुरुषांच्या विचार विचारांचा प्रसार आणि प्रसार व्हावा यादृष्टीने पुण्यतिथी व जयंती साजरी करावी असे सांगत अहिल्यादेवी यांचे कार्य सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भटक्या विमुक्त सेल चे तालुकाध्यक्ष एस. सी. तेले यांनी केले. आभार प्रदर्शन गोपीचंद शिरसाट यांनी केले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टी माजी शहराध्यक्ष हरचंद लांडगे, धनगर महासंघाचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र लांडगे, मौर्य क्रांती संघाचे उपजिल्हाध्यक्ष रमेश शिरसाट, मौर्य क्रांती संघाचे तालुकाध्यक्ष गोपीचंद शिरसाट, धानोरा माजी सरपंच दिलीप ठाकरे, व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग चे जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, सोपान भवरे, अजय भामरे, दयाराम पाटील, संजय शिरसाठ, मोतीलाल जाधव, पी. वाय. पाटील, रविद्र लाळगे, भाऊलाल पाटील, प्रदीप कंखरे, संदीप जैन, दिलीप खांडेकर, हेमंत पवार, अशोक पाटील, दिलीप गढरी, विकास सूर्यवंशी, मनोहर धनगर, जयप्रकाश लांडगे, जगदीश भागवत, देविदास हटकर, महेश हटकर, बाळू देवकाते, समस्त धनगर समाजातील कार्यकर्ते आदी हजर होते.